December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

त्या कुटुंबियांना आमदार भोईर यांच्याकडून आर्थिक मदत

दोघा मुलींच्या शिक्षणाचा खर्चही शिवसेना उचलणार

कल्याण

शिर्डीला जाणाऱ्या टिटवाळ्याच्या तिघा साईभक्तांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना पुन्हा एकदा ठामपणे उभी राहिली आहे. या साईभक्तांच्या कुटुंबियांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून प्रत्येकी २ लाखांची आर्थिक मदत करण्यासह शिवसेना शहर शाखेकडून त्यांच्या दोघा लहान मुलींच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेण्यात आली आहे. टिटवाळ्यातील या कुटुंबियांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आर्थिक मदत देण्यात आली.

शिर्डीला जाणाऱ्या साई पालखीमधील तिघा साईभक्तांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. टिटवाळ्यातील भावेश पाटील, रविंद्र उर्फ सुरेश पाटील आणि साईराज भोईर या तिघा साईभक्तांचा भरधाव गाडीची धडक बसल्याने मृत्यू झाला. त्यानंतर गेल्याच आठवड्यात शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी या कुटुंबियांची भेट घेत आम्ही या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा शब्द दिला होता. शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी या शब्दाला जागत या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाखांची आर्थिक मदत करत आपली संवेदना प्रकट केली. तर या अपघात प्रकरणातील आरोपींवर कारवाईसाठी चालढकल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आणि या घटनेतील खऱ्या आरोपींना अटक करण्यासाठीही शिवसेनेने पोलीस प्रशासनाला भाग पाडले.

या तरुणांचा संसार उघड्यावर येऊ देणार नाही असा आम्ही शब्द दिला होता. या कुटुंबाचे दुःख एवढे मोठे आहे की ते कोणीही वाटून घेऊ शकत नाही. परंतु या कुटुंबाला आर्थिक मदत देत त्यांच्या दोघा मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलत हे दुःख हलके करण्याचा छोटासा प्रयत्नही आम्ही केल्याची भावना यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शहरप्रमुख रवी पाटील, विधानसभा संघटक मयूर पाटील, माजी नगरसेवक जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, उपशहरप्रमुख विजय देशेकर, उपविभाग प्रमुख बबलेश पाटील, मांडा वेस्ट शाखाप्रमुख किरण पाटील, टिटवाळा शाखाप्रमुख अशोक चौरे, उपशहर अधिकारी विकास भोय, उपशाखाप्रमुख अनिल दुबे यांच्यासह विनायक गुरव, साई आश्रय पालखीचे अध्यक्ष राम भोईर, सतिश देशेकर, विनायक काळण, दिपक भोईर, नरेश पाटील, प्रल्हाद पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.