पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निर्धार
कल्याण
युतीत कल्याण पश्चिम विधानसभेची जागा सन २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेला सोडण्यात आल्यामुळे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या सारख्या कर्तुत्ववान नेतुत्वावर अन्याय झाला. नरेंद्र पवार यांच्या आमदारकीच्या कालवधीत कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील विकासाभिमुख कार्याची नागरिकांनी कायम प्रशंसा केली. मात्र आमदार नसताना देखील मागील ५ वर्षात पवार यांनी केलेल्या कामामुळे, कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील नागरिक आज त्यांनाच आमदार मानतात. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष नेतृत्वाने मुळची भाजपाची असेलेली कल्याण पश्चिम विधानसभेची जागा युतीत भाजपालाचं सोडावी असा निर्धार भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी कल्याणात आयोजित दोन दिवसीय शासकीय योजनांच्या शिबिरात व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र पवार फाऊंडेशनच्या वतीने कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात दोन दिवसीय शासकीय योजनांच्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. गुरुवार १ ऑगस्ट व शुक्रवार २ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० ते रात्री ८ वाजेपर्यंत कल्याण पश्चिमेतील भोईरवाडी – बिर्ला कॉलेज रस्ता येथील श्री सिद्धीविनायक हॉल याठिकाणी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा उद्घाटन सोहळा माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सूर्यवंशी, कल्याण पश्चिम मंडलाचे अध्यक्ष वरुण पाटील, मोहने टिटवाळा मंडलाचे अध्यक्ष शक्तिवान भोईर, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष रेखा चौधरी तसेच भाजपा कल्याण पश्चिम व मोहने – टिटवाळा मंडळ, कल्याण जिल्हा, महाराष्ट्र प्रदेश, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला.
कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र पवार फाऊंडेशनच्या वतीने दोन दिवसीय शासकीय योजनाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, मतदार नोंदणी अभियान, आभा कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड या योजनांचा नागरिकांनी उस्फुर्त लाभ घेतला. यामध्ये दोन दिवसाच्या शिबिरात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी १२३० महिलांनी सहभाग नोंदवला. तसेच मतदार नोंदणी अभियानात दोन दिवसाच्या शिबिरात ६०० नागरिकांनी मतदार नोंदणी केली तर आभा व आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा ८४० नागरिकांनी लाभ घेतला.
माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयातून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज केल्यानंतर शासनाने प्रथम अर्ज मंजूर केलेल्या या योजनेच्या कल्याण शहरातील पहिल्या लाभार्थी महिला गायत्री शेळके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या महत्वकांक्षी आभा कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सदरच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार सहकारी मित्र रवी चौधरी यांनी खूप मेहनत घेतली. त्याचप्रमाणे सदरचे दोन दिवसीय शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपा पदाधिकारी – कार्यकर्ते, नरेंद्र पवार फाउंडेशनचे सर्व सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली.
दरम्यान या शिबिराच्या माध्यमातून दोन दिवसात अनेक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा मनोदय माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला. मी आजवर केलेलं कार्य हे केवळ नागरिक केंद्र बिंदू मानून केले आहे. आमदार असताना त्या पदाला शहर विकास व सामाजिक कार्याच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सन २०१९ साली पक्षाने युतीत वेगळा निर्णय घेतला. त्यावेळी मी अपक्ष निवडणुकीला समोर गेलो तेव्हाही नागरिकांनी मला ४३ हजरांचे मोठे मताधिक्य दिले. नागरिकांच्या याच मतांचा आदर ठेऊन मी आज हि सामाजिक कार्यासाठी थांबलो नाही. पक्ष देईल ती संघटनात्मक जबाबदारी सांभाळताना कल्याण पश्चिम विधान सभा क्षेत्रात काम करीत आहे असे मत यावेळी माजी आमदार पवार यांनी बोलताना व्यक्त केले.
आणखी बातम्या
महाराष्ट्रासह देश-विदेशातील 96 जोडपी विवाहबद्ध
खडकपाडा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसोबत बैठक संपन्न
वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे : आमदार भोईर