December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षण देणे ही काळाची गरज : आमदार भोईर

संस्कृती – परंपरा जपणाऱ्या मुख्याध्यापक – शिक्षकांचा हरीनाम सप्ताहात सन्मान

कल्याण

शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षण देणे ही काळाची गरज असल्याची भावना कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली आहे. तसेच वारकरी परंपरेसोबतच हिंदू संस्कृती जपणाऱ्या जेष्ठ वारकऱ्यांचे मार्गदर्शनही समाजाला आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

निमित्त होते ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्या निमित्त कल्याणात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या सौजन्याने आणि कल्याण शहर वारकरी सांप्रदाय प्रबोधन ट्रस्टच्या माध्यमातून हा सप्ताह सुरू आहे. या हरीनाम सप्ताह सोहळ्याच्या सहाव्या दिवशी आळंदी येथील ह.भ. प. यशोधन महाराज साखरे यांचे सुमधुर किर्तन झाले. या किर्तनाला आपली संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या कल्याण शहरातील 15 शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते.

त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी शालेय शिक्षणामध्ये आवश्यक त्या पुस्तकी ज्ञानासोबतच अध्यात्माची जोडही आवश्यक बनली आहे. तर गेल्या शेकडो वर्षापासून आषाढी वारीला पायी चालण्याची परंपरा इतक्या वर्षांनंतरही कायम ठेवणाऱ्या, वारकरी संप्रदायाचे मार्गदर्शन समाजाला योग्य दिशा दाखविण्यासाठी जरुरी असल्याचेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शाळेच्या माध्यमातून हिंदू संस्कृती जोपासण्यासाठी कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक – मुख्याध्यापिका, शिक्षक-शिक्षिका यांच्यासह पायी वारी करून वारकरी परंपरा जपणाऱ्या जेष्ठ वारकऱ्यांचाही आमदार विश्वनाथ भाईर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला विधानसभा संघटक प्रभुनाथ भोईर, उपशहर प्रमुख सुनील खारूक ह.भ.प.मुंढे महाराज, ह.भ.प.सर्जीने महाराज, ह.भ.प. चिरोटे महाराज, ह.भ.प. सांगळे महाराज, वारकरी मंडळाचे नेहकर, प्रल्हाद खंडागळे, चंद्रकांत सावंत, बागूल सर, हेमंत गव्हाणे आणि वारकरी समुदायाची मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.