सुरेखा पैठणे
शहापूर
तालुक्यातील पिताश्री लॉन येथे “रेनी कारनिव्हल : संवाद तरुणाईचा२०२४” मोठ्या उत्साहात साजरा झाला. ह्या कार्यक्रमाचे उद्घघाटक म्हणून मुंबई विद्यापीठाच्या कला अकादमी विभागाचे विभागप्रमुख पद सांभाळणारे गणेश चंदनशिवे सर हे लाभले. शिव बिरसा फुले शाहू आंबेडकरी विचारधारा कलेच्या विविध माध्यमातून प्रवाहित करणारा हा कारनिव्हल ठरला. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद शैलेश दोंदे यांनी भूषविले.
ह्या मुक्त अभिव्यक्तीमंचावर वाडा, मोखाडा, मुरबाड , शहापूर, भिवंडी आणि कल्याण अंबरनाथ बदलापूर सारख्या ठिकाणाहून तरुणांनी सहभाग घेतला. एकपात्री, अभिवाचन, कविता गाणी अश्या अनेक अंगाने हा कार्यक्रम फुलत गेला. दुपारच्या सत्रात झालेला ‘आरक्षण उपवर्गीकरण’ ह्या विषयावर झालेला संसद संवाद अर्थात अभिरुप संसद तर इतका उत्कंठावर्धक झाला की अनेक उपस्थित तरुणांनी यात सहभागी होत संसदेचे कामकाज चालविले.
लॉनमध्ये रेनी कारनिव्हलचा सेल्फी पॉईंट, समतेचे झाड, कवितांचा बॅनर, महापुरुषांच्या प्रतिमांचा विचारप्रवाह दाखविणारा बॅनर तसेच समतेची मशाल प्रज्वलीत करून पुष्पांजली वाहत उद्घाटन झाले.
संविधानाची उद्देशिकेचे वाचन, नुकत्याच निधन पावलेल्या कार्यकर्त्यांना दिलेली श्रद्धांजली आणि महिला व बाललैंगिक अत्याचाराच्या विरोधात निषेधाचा ठराव मांडला गेला.
संध्याकाळी संपन्न झालेला कविकट्टा तर कार्यक्रम आणखी दिमाखदार होण्यास महत्वपूर्ण ठरला. यात कवी संदेश कर्डक, कवी जगदेव भटू, कवी नवनाथ रणखांबे तसेच अनेक स्थानिक कविमित्र सहभागी होते.
कार्यक्रमात अनेक मान्यवर संस्था आणि संघटनांच्या मान्यवरांनी उपस्थिती दर्शवित सहभागी तरुणांचा उत्साह वाढवला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडावा यासाठी समता संघर्ष संघटनेचे सर्व कार्यकर्ते आणि समता संघर्ष सांस्कृतिक मंचाचे समनव्यक यांनी अपार कष्ट घेतले.
शहापूर तालुक्यातील अनेक सामाजिक संघटनांचे सदस्य, समविचारी संघटनाचे पदाधिकारी यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन तरुणांचा उत्साह वाढविला.
भरत निचिते, साधना भेरे, व्ही. एस. जाधव, अशोक दुधसागरे, महेंद्र उबाळे तसेच समता संघर्ष संघटनेचे सर्व पदाधिकारी यात गणेश सोष्टे, सदानंद गायकवाड, अविनाश दोंदे श्रीकांत कांबळे तसेच समता सांस्कृतिक मंचचे मिलिंद जाधव, रोहित जाधव,अक्षय भोईर, संघरत्न घनघाव, सागर भोईर आणि तरुण कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह