आमदार विश्वनाथ भोईर यांचा केडीएमसी प्रशासनाला अल्टिमेटम
कल्याण
गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी कल्याणात रस्त्यांवर पडलेले सर्व खड्डे काहीही करून भरण्याचे अल्टिमेटम आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी प्रशासनाला दिले आहे. तसेच गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे भरले गेले नाहीत, तर आम्ही शिवसैनिक आहोत जे काही करायचे ते आम्ही करूच अशा शब्दांत आमदार भोईर यांनी केडीएमसी आयुक्तांची कानउघाडणी केली.
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार भोईर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण पश्चिमेत रस्त्यांवर पडलेले खड्डे, अस्वच्छता, रिंगरोडचे, स्मार्टसिटीचे काम आदी प्रमूख मुद्द्यांवर केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांची भेट घेत हे अल्टिमेटम दिले.
कल्याणचा सार्वजनिक गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक कल्याणातील गणेशोत्सव आणि त्यात सादर केलेले देखावे पाहण्यासाठी येत असतात. त्यामुळे कल्याण शहरातील रस्ते आणि स्वच्छतेच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड इशारा आमदार भोईर यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे. तसेच कल्याण शहर हे नावाला नाही तर प्रत्यक्षात खरोखर हे शहर स्मार्ट वाटले पाहिजे, सर्व रस्ते व्यवस्थित दिसले पाहिजेत, सगळीकडे स्वच्छता दिसली पाहिजे असेही त्यांनी या बैठकीत केडीएमसी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले.
या बैठकीला आमदार विश्वनाथ भोईर, केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, माजी नगरसेवक प्रभूनाथ भोईर, संजय पाटील, सुनिल वायले, जयवंत भोईर, मोहन उगले, विद्याधर भोईर यांच्यासह नितीन माने, विजय देशेकर, रामदास कारभारी, डॉ. धीरज पाटील आणि केडीएमसीचे प्रमूख अधिकारी उपस्थित होते.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह