आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याला यश
कल्याण
कल्याणकरांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून केली जाणारी सुसज्ज हॉस्पिटलची मागणी आता पूर्ण होणार आहे. कल्याण पश्चिममध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून 100 बेडचे अतिशय अद्ययावत असे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. हे हॉस्पीटल उभारण्यासाठी आवश्यक असणारी कायदेशीर, तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागरिकांचा सेवेमध्ये रुजू होईल असा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे. तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सुसज्ज रुग्णालयाचे कल्याणकरांना आश्वासन दिले होते.
वाढती लोकसंख्या आणि या लोकसंख्येला अपुरे पडणारे कल्याण डोंबिवली महापालिकेचे रुक्मिणीबाई रुग्णालय पाहता शहरासाठी एका सुसज्ज आणि अद्ययावत शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज होती. ही गरज ओळखून आमदार विश्वनाथ भोईर यांनी निवडून आल्यापासुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यानूसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केडीएमसी प्रशासनाला असे सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचे निर्देश दिले. आणि मग केडीएमसी प्रशासनानेही वेळ न दवडता त्यादृष्टीने कार्यवाही सुरू केली. रुग्णालयाच्या दृष्टिकोनातून गौरीपाडा परिसरात तळ+ 3 मजल्यांची बांधून तयार इमारत केडीएमसीला प्राप्त झाली आहे. याठिकाणी पीपीपी तत्त्वावर हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार असून इतर सर्व अद्ययावत सुविधांसह हृदय विकारावरील उपचारांसाठी सुसज्ज अशी कॅथलॅबही उभारण्यात येणार आहे. या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी सल्लागार नेमण्यात आला असून लवकरच त्याची निविदा प्रसिद्ध केली होणार आहे.
कल्याणकरांना एक चांगले रुग्णालय देऊ शकलो याचा आनंद – आमदार भोईर
गौरीपाडा परिसरात हॉस्पिटलसाठी आरक्षित भूखंडावर ही तीन मजली इमारत बांधण्यात आली असून याठिकाणी 16 हजार स्क्वेअर फुटांहून अधिक भव्य जागेवर 100 बेडचे हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहतेय याचा मनस्वी आनंद होत आहे. निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही आपण सुसज्ज रुग्णालयाचे आश्वासन दिले होते. या रुग्णालयाच्या पूर्ततेच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले असून लवकरच हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागरिकांच्या सेवेत रुजू होईल असा विश्वास आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.
एमपीजेवाय योजनेंतर्गत याठिकाणी मोफत उपचार…
या रूग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेंतर्गत(आयुष्मान भारतअंतर्गत पात्र लाभार्थी) सर्व आजारांवर मोफत तर त्यात न बसणाऱ्या आजारांवर अत्यल्प दरांमध्ये उपचार केले जाणार आहेत. यासाठी केडीएमसीकडून संबंधित भागीदाराला ही इमारत देण्यात येणार असून त्यांच्याकडून या रुग्णालयासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उभारण्यात येणार असल्याची माहितीही केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी दिली आहे.
या पाहणी दौऱ्यावेळी केडीएमसी आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर, साथरोग नियंत्रण विभाग अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, माजी नगरसेवक गणेश जाधव, डॉ. धीरज पाटील उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड, विभागप्रमुख अंकुश केणे, शाखाप्रमुख अशोक भोईर आणि केडीएमसीचे माजी उपआयुक्त प्रकाश गव्हाणकर उपस्थित होते.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह