सारथी आणि एमसीईडीमार्फत महिलांसाठी मोफत चिकू फळ प्रकिया प्रशिक्षण
पालघर
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (SARATHI) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराणी सहिबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य विकास योजने अंतर्गत कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा या समाजातील युवती व महिलांकरिता चिकू-फळ प्रक्रिया प्रशिक्षण या मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे १९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर येथे आयोजन केले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये चिकूपासून तयार केलेले विविध पदार्थ, चिकू पावडर, चिकू चिप्स, चिकू हलवा, चिकू मोहनथाल, चिकू लोणचे, चिकू जाम, चिकू मिल्कशेक आदींबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन त्याचबरोबर पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि शासनाच्या विविध योजना, बँकिंग प्रकल्प अहवाल, उद्योगात लागणारे कागदपत्र, मार्केटिंग विविध उद्योग संधी, उद्योजकीय मानसिकता, उद्योजकीय गुणसंपदा आदी विषयावर रोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत तज्ञांमार्फत मार्गदर्शन होणार आहे.
एक दिवस प्रत्यक्ष औद्योगिक भेट होणार असून पुढील एक वर्ष लाभार्थीना मदत तथा पाठपुरावा एमसीईडीमार्फत मोफत होणार आहे.
सदरील प्रशिक्षणासाठी एकुण ३० महिलांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार असून इच्छुकांनी सदरील प्रोग्रामची सविस्तरपणे माहिती घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र द्वारा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र १०३, प्रशासकीय इमारत अ, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोळगाव पालघर येथे १७ सप्टेंबरपर्यंत संपर्क करावा असे आवाहन विभागीय अधिकारी सारथी आणि एम. सी. ई. डी. मुंबई यांनी केले आहे.
आणखी बातम्या
रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न