December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

रस्त्यावर पडणाऱ्या कचऱ्यासाठी जाळीदार कचरा कुंडी

कल्याण

संपूर्ण देशात १८ सप्टेंबर ते २ आक्टोंबर पर्यंत सुरु असलेल्या केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमा अंतर्गत पूर्वेतील सहयोग या सेवा भावी संस्थेने प्रभाग ४ जे मधील पुणे लिंक रोडवर नागरीक कचरा टाकत असलेल्या ठिकाणी ओला कचरा तसेच सुका कचरा टाकण्यासाठी जाळीदार कचरा कुंडी उपलब्ध करून दिली आहे. या कचरा कुंडीचे लोकार्पण प्रभाग ४ जे चे सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रभाग ४ जे अंतर्गत असलेल्या पुणे लिंक रोडवरील रस्त्यावर नागरीक मोठ्या प्रमाणावर कचरा टाकत आहेत. हा कचरा रस्त्यावर अस्ताव्यस्त पडू नये म्हणून सहयोग संस्थेने या ठिकाणी सुमारे ८ फुट लांबी – रुंदी आणि ४ फुट उंचीची लोखंडी जाळीदार कचरा कुंडी ठेवली आहे. या कुंडीत ओला आणि सुका कचरा टाकण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या जाळीदार कचरा कुंडीचे औपचारिक लोकार्पण सहाय्यक आयुक्त तामखेडे तसेच प्रभाग ५ ड च्या सहाय्यक आयुक सविता हिले यांचे हस्ते करण्यात आले.

 देश हा कचरा कुंडी मुक्त करण्याचा संकल्प केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवला जात आहे. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव कचरा कुंडी आवश्यक असेल तरीही ती कायम स्वरूपी नसावी, कारण कचरा कुंडी मुळे परिसर अस्वच्छ होऊन वातावरणात दुर्गंधी पसरत असते. म्हणून नागरीकांनी स्वयंस्फूर्तीने आपला कचरा हा सार्वजनिक ठिकाणी न टाकता तो घंटा गाडीतच टाकावा जेणे करून सार्वजनिक परिसर सदैव स्वच्छ राहिल.सहाय्यक आयुक्त तामाखेडे 

कल्याण पूर्व परिसर हा अत्यंत दाटीवाटीच्या लोकवस्तीचा आहे ज्या ठिकाणी घंटागाडी पोहचत नाही ते नागरीक घंटागाडीची वाट न बघता सरळ कचरा रस्त्यावर आणून टाकतात. हाच कचरा रस्त्यावर पसरू नये म्हणून नाईलाजास्तव अशा प्रकारच्या कचरा कुंडया ठेवाव्या लागतात, नागरीकांनी आपला कचरा शक्य तो घंटा गाडीतच टाकण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन विजय भोसले यांनी केले.

या समयी बांधकाम उपअभियंता धर्मेंद्र गोसावी, मुकादम संतोष साळुंखे , माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के, ज्येष्ठ समाजसेवक कालिदास कदम, प्रमोद दिवेकर, अभिषेक बने, रवी देवळे, राकेश झांजे, कमलेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.