December 5, 2024

news on web

the news on web in leading news website

केडीएमसी क्षेत्रात होणार आकांक्षी शौचालयांची निर्मिती !

१२ ठिकाणी ७२ शौचालय आणि ३६ मुतारी युनिट्स

कल्याण

महापालिका आयुक्त डॉ इंदू राणी जाखड यांच्या संकल्पनेतून, नागरिकांच्या विशेषतः महिलांच्या सोयीसुविधासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी आकांक्षी शौचालये (Aspirational Toilets) निर्मितीचे पाऊल महापालिकेने उचलले आहे, या अंतर्गत, स्वच्छ आणि सुसज्ज शौचालये उभारण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे, कारण वाढत्या नागरीकरणामुळे शौचालयांची गरज देखील वाढली आहे.

त्यामुळे सन २००९ मध्ये निर्मल MMR अंतर्गत MMRDA च्या माध्यमातून निधी मिळाल्याने बांधण्यात आलेल्या जुन्या शौचालयांना आधुनिक आणि उपयुक्त बनवण्याच्या दृष्टिकोनातून या प्रक्रियेची सुरुवात झाली झाली आणि कालांतराने सार्वजनिक शौचालयांची मागणी वाढल्यामुळे, अधिक प्रगत सुविधा पुरवणारी शौचालये आवश्यक ठरली. याचाच एक भाग म्हणून, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत कडोंमपाने विविध 12 ठिकाणी आकांक्षी शौचालयांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत एकूण 72 शौचालय युनिट्स आणि 36 मुतारी युनिट्स बांधण्यात येणार आहेत, यासाठी शासनाची मंजुरी आधीच मिळाली आहे, आणि काही ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे.

उदा.राणी लक्ष्मीबाई उद्यानासमोरील आणि आधारवाडी अग्निशमन केंद्रासमोरील शौचालयांची बांधणी प्रक्रिया चालू आहे. याशिवाय, कल्याण पश्चिम येथील मुंबई विद्यापीठाजवळ ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांच्या मागणीनुसार प्रिफॅब्रिकेटेड स्वरूपाचे सुसज्ज शौचालय लवकरच सुरू होणार आहे. डोंबिवलीतील गणेश घाट कुंभारखानपाडा, ९० फिट रोड ,टंडन रोड जवळील पुसाळकर उद्यान, मोठागाव ठाकुर्ली गणेश घाट येथे देखील या शौचालयांची उभारणी होणार आहे.

आकांक्षी शौचालये प्रकल्पात महिला वर्गासाठी विशेष सुविधा पुरवली जाणार आहेत, कारण भारतासारख्या देशात अजूनही महिलांना ‘राईट टू पी’ साठी संघर्ष करावा लागतो. या शौचालयांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित सुविधा असतील.

महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी या प्रकल्पावर भर देत नुकतीच संबंधित विभाग, अभियंते, पीएमसी आणि प्रभाग क्षेत्रांच्या सहा आयुक्तांसमवेत सोबत बैठक घेऊन कामाचा आढावा घेऊन त्यांना विहित मुदतीत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे नागरिकांना लवकरच या शौचालयांचा लाभ मिळू शकेल.

या आकांक्षी शौचालय प्रकल्पात महिला वर्गाच्या गरजा ओळखून निर्णय घेतले जात आहेत. उदा; कल्याण स्टेशन परिसरातील कपोते मल्टीलेवल पार्किंगच्या परिसरात महिलांसाठी सुसज्ज शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महिला वर्गाच्या सुरक्षितता आणि स्वच्छतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त यांनी महिलांसाठी स्वच्छ शौचालये आणि मुलभूत सुविधा पुरवण्याबाबत जागरूक भूमिका घेतल्याचे दिसून येते.

आकांक्षी शौचालयांची निर्मिती ही केवळ शहराच्या स्वच्छतेसाठी नाही, तर नागरी सुविधांमध्ये सुधारणा आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे. वाढत्या नागरीकरणामुळे ज्या ठिकाणी शौचालयांची आवश्यकता अधिक तीव्र झाली आहे, तेथे या शौचालयांची बांधणी लवकरच पूर्ण होईल. या प्रकल्पात विशेषतः महिलांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी सुसज्ज शौचालयांची निर्मिती होईल , त्याचप्रमाणे काही शौचालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी देखील स्वतंत्र सुविधा करण्यात येत आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हे या प्रकल्पाद्वारे सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या दिशेने एक आदर्श उदाहरण बनवू पाहत आहे.

स्वच्छ शौचालयांचा अभाव असलेल्या ठिकाणी आकांक्षी शौचालयांची निर्मिती ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक बदल घडवेल.