लाडकी बहीण संपर्क अभियानाला
कल्याणात दणक्यात प्रारंभ
कल्याण
मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे पोट भरणाऱ्या राज्यातील माझ्या भगिनींसाठी दीड हजार रुपये ही खूप मोठी रक्कम आहे. कोट्यवधींचे घोटाळे करणाऱ्या लोकांना दिड हजार रुपयांचे मोल कसे कळणार? अशा शब्दांत कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्ला चढवला.
कल्याण पश्चिमेतील शिवसेनेच्या उंबर्डे – कोळीवली विभागीय शाखेतर्फे आयोजित लाडकी बहीण संपर्क अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील शेकडो लाभार्थी महिलांनी मोठी गर्दी केली होती. या लाभार्थी महिलांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील गाण्यावर उपस्थित लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्तपणे ठेका धरल्याचेही दिसून आले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आल्यापासून महाविकास आघाडीतील नेत्यांनी विरोध केला आहे. काहींनी तर आमचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही ही योजना बंद करू अशी जाहीर घोषणाही केली आहे. परंतु आतापर्यंत ज्या लोकांनी राज्यामध्ये कोट्यवधींचे आर्थिक घोटाळे केले आहेत. अशा व्यक्तींना हे दिड हजार रुपये म्हणजे शुल्लक वाटत आहेत. मात्र राज्याच्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणीसाठी या दिड हजारांचे मोल खूप जास्त असल्याचे मत आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान केल्यास ही योजना अव्याहतपणे सुरू राहील. इतकेच नाही तर त्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचे ठोस आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याची आठवण आमदार भोईर यांनी यावेळी करून दिली. आणि आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहनही केले.
दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील “अनाथांचा नाथ एकनाथ ” या गाण्यावर उपस्थित लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्तपणे ठेका धरत या योजनेप्रती आपला आनंद व्यक्त केल्याचे दिसून आले.
या लाडकी बहीण संपर्क अभियानाला आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना उपनेत्या विजया पोटे, शहर प्रमुख रवी पाटील, विधानसभा संघटक छाया वाघमारे, शहर संघटक नेत्रा उगले, उपशहरप्रमूख अंकुश जोगदंड, विजय देशेकर, माजी नगरसेवक मोहन उगले, जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, नगरसेविका वैशाली भोईर, माजी परिवहन समिती सदस्य सुनिल खारुक, विभाग प्रमुख रामदास कारभारी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ ॲक्टिव्ह