मतदारसंघातील प्रभागांवर ड्रोनची करडी नजर
कल्याण
एकीकडे विधानसभा निवडणुकीचा राजकीय प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासह आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने अत्याधुनिक अशा ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली जात असून कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा पोलिसांनी आपल्या हद्दीतील विविध भागांमध्ये या ड्रोनचे टेस्ट रन केले.
येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून त्याला आता अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. मतदारसंघातील प्रचाराचा धुरळा आता शिगेला पोहोचला असून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाची ही सर्व प्रक्रिया आणि आचारसंहिता निर्धोकपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. राजकीय प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच राजकीय पक्षांकडून आचारसंहितेचा भंग होऊ नये याची विशेष दक्षता पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.
त्याअंतर्गत खडकपाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात येत असून त्यासोबतच आता ड्रोन कॅमेऱ्यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचीही गस्त घालण्यासाठी मदत घेतली जात आहे. खडकपाडा पोलिसांनी आपल्या हद्दीवर देखरेख ठेवण्यासाठी 5 ड्रोन कॅमेरे तैनात केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांनी दिली. तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकपाडा येथील साई चौक, कैलाश पार्क, साई संकुलासह योगीधाम परिसरात गर्दीच्या ठिकाणचे पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज या ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान मतदारसंघांमध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी एकीकडे स्थानिक पोलिसांच्या जोडीला केंद्रीय राखीव पोलीस दलाची तुकडीही कल्याण परिमंडळात तैनात करण्यात आली आहे. त्यासोबतच आता पोलीस प्रशासन ड्रोन कॅमेऱ्याच्या तिसऱ्या डोळ्याचीही मदत घेत असून कोणतीही अपप्रवृत्ती किंवा नकारात्मक घडामोड आता पोलिसांच्या नजरेतून सुटणार नाही असा विश्वास पोलीस प्रशासन व्यक्त करत आहे.
आणखी बातम्या
‘दि वात्सल्य फाऊंडेशन’चा ‘स्नेहमिलन’ सोहळा साजरा
कल्याणमध्ये फुल मॅरेथॉन संपन्न
अफवांना बळी पडू नका : खासदार शिंदे