April 16, 2025

news on web

the news on web in leading news website

गीतकार जावेद अख्तर यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जाहीर

पत्रकार राजू परुळेकर यांना समष्टी ऊलगुलान पुरस्कार जाहीर

मुंबई

विचार, विद्रोह, शब्द, संवेदना आणि कृती यांचा संगम घडवणाऱ्या समष्टी फाऊंडेशनने प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची यंदाची घोषणा करण्यात आली आहे. प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार तर राजू परुळेकर यांना समष्टी ऊलगुलान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांना ‘सत्यशोधक उपाधी’ ही प्रदान करण्यात येणार आहे.

‘सारं काही समष्टीसाठी’ या सोहळ्याचे यंदा आठवं वर्ष आहे. ११ आणि १२ एप्रिल २०२५ रोजी भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात दुपारी १२ ते रात्री १० या वेळेत हा दोन दिवसीय सोहळा रंगणार आहे. या दोन दिवसांत कला, साहित्‍य, सिनेमा, सामाजिक आदी विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

या सोहळ्या दरम्यान ७ मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. साहित्य आणि भाषाशास्त्रात ५० वर्षांच्या दिलेल्या योगदानासाठी प्रख्यात गीतकार व विचारवंत जावेद अख्तर यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांना समष्टी ऊलगुलान पुरस्कार, आयपीएस अधिकारी संदिप तामगाडगे यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार, प्रसिद्ध साहित्यिका डॉ. श्यामल गरूड यांना समष्टी गोलपीठा पुरस्कार, डॉ. अमोल देवळेकर यांना समष्टी निर्मिक पुरस्कार, तर एड. दिशा वाडेकर यांना समष्टी मूकनायक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

अक्षय शिंपी यांची हृदयस्पर्शी दास्तांगोई सादरीकरण, रसिका आणि कृतिका बोरकर यांचा संगीत कार्यक्रम, वरुण सुखराज, सुमेध, मयुरेश कोण्णूर यांचा आशिष शिंदे यांच्यासोबत संवाद, सुकन्या शांता, दीपा पवार, अलका धुपकर, एड. दिशा वाडेकर यांच्यासोबत परिसंवाद, ‘तुही यत्ता कंची’- हेमंत ढोमे, मंदार फणसे, प्रज्ञा पवार, सत्यशोधक जलसाचे विशेष सादरीकरण, मालविका राज, सिद्धेश गौतम, कैलास खानजोडे, प्रशांत कुवर, रोहीणी भडांगे, स्वप्ना पाटसकर विक्रांत भिसे आणि लक्ष्मण चव्हाण आदी कलाकारांचे चित्र आणि शिल्प प्रदर्शन हे यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य असणार आहे.

सदर सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. स्वप्नील ढसाळ, वैभव छाया, हरेश तांबे यांनी केले आहे.