October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

गड-किल्यांच्या तेजाने उजळला द्वारका विद्यालयाचा दीपोत्सव

कल्याण

पूर्वेतील द्वारका विद्यालयात दीप अमावास्येच्या निमित्ताने गड-किल्यांच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देणारा अनोखा दीपोत्सव साजरा करण्यात आला. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. या खास दिवशी विद्यार्थ्यांनी या १२ किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारल्या आणि त्या भोवती दिव्यांची आरास करून दीपोत्सव साजरा केला. ‘गड-किल्यांचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गड-किल्यांच्या प्रतिकृती अतिशय कुशलतेने साकारल्या.

उपक्रमाला सदिच्छा देण्यासाठी संस्थापक दत्तात्रय दळवी, संचालिका तथा मुख्याध्यापिका मिरा दळवी, नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद, राम मराठे, अमोल कामत, केडीएमसी ‘ड’ वार्डचे प्रभाग अधिकारी उमेश यमगर, स्टडी व्हेवज बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक उमाकांत चौधरी, समाजसेविका वर्षाताई कळके, जेष्ठ शिक्षक राजाराम पाटील, विद्यालयाच्या व्यवस्थापिका सीमा दळवी, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका गौरी देवधर, प्राथमिकचे मुख्याध्यापक प्रकाश धानके आदी मान्यवर उपस्थित होते.

दीवांनी सजलेले हे किल्ले आणि विद्यालयाचा परिसर अत्यंत नयनरम्य वातावरण निर्माण करत होते. या उपक्रमासाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. दीप अमावास्येच्या निमित्ताने साजरा झालेला हा अनोखा दीपोत्सव सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.