October 19, 2025

news on web

the news on web in leading news website

आधारवाडी कारागृहात ‘दिवाळी पहाट’

कल्याण

आधारवाडी कारागृहात शनिवारी ‘दिवाळी पहाट’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ठाण्यातील सूर ताल ग्रुपने भावगीत, भक्तिगीत, देशभक्तीपर तसेच मराठी आणि हिंदी गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन केले. प्रमुख पाहुणे म्हणून उल्हासनगरचे सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी उपस्थित होते.

अपर पोलिस महासंचालक डॉ. सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक व कारागृह उपमहानिरीक्षक (दक्षिण विभाग, मुंबई) योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृह अधीक्षक प्रदीप जगताप यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कारागृह विभाग, सेवाधाम सामाजिक संस्था, ठाणे आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.

कारागृहात सध्या नर्सिंग कोर्स, संगणक प्रशिक्षण तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून कौशल्यविकास प्रशिक्षण सुरू आहे. दीपावली सणाचे औचित्य साधून महिला बंदिवानांनी रांगोळ्या, आकाशकंदील, कानातील व गळ्यातील दागिने अशा विविध वस्तू तयार केल्या. या वस्तूंपैकी सुमारे चार हजार किमतीच्या वस्तू विकल्या गेल्या असून ती संपूर्ण रक्कम महिला बंदिवानांना देण्यात येणार आहे. तसेच, महिला बालकल्याण समितीच्या राणी बैसाने यांनी सहेली संस्थेच्या मदतीने शिवणकामासाठी शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. तर प्रिझन मिनिस्ट्री, मुंबई ही संस्था महिला बंदिवानांना फॅशन डिझाइनचे प्रशिक्षण देत असल्याची माहिती अधीक्षक जगताप यांनी दिली.

या कार्यक्रमाला सेवाधाम, प्रयास संस्था, प्रिझम मिशनरी, फन क्लब, रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड, सहेली संस्था आणि बालकल्याण समिती, ठाणे या संस्थांचे प्रतिनिधी तसेच कारागृहातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत चौधरी यांनी केले.