कल्याण
सहयोग सामाजिक संस्था, कल्याण (पूर्व) यांच्या वतीने आज कल्याण स्टेशन (पूर्व) ते सिद्धार्थ नगर व कोळसेवाडीला जोडणाऱ्या स्कायवॉकवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमामुळे स्कायवॉक परिसर स्वच्छ, आकर्षक आणि प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर होणार आहे.
दररोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करतात, त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे आमदार सौ. सुलभाताई गायकवाड यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, “मी माझ्या आमदार निधीतून स्कायवॉक रंगरंगोटी व सुशोभीकरणाचे काम लवकरच पूर्ण करून घेणार आहे.”
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, “स्टेशन परिसरातील स्कायवॉक स्वच्छ राहणे अत्यंत आवश्यक आहे. या मोहिमेचे सातत्य राखण्यासाठी महानगरपालिका दररोज देखरेख ठेवेल व नियमित साफसफाईचे आदेश देण्यात आले आहेत.”
रेल्वे प्रशासन देखील या स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार असून, सहयोग सामाजिक संस्था दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी अशी स्वच्छता मोहीम राबवणार आहे. संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी सांगितले की, “रेल्वे अधिकारी, केडीएमसी अधिकारी आणि सफाई कर्मचारी यांच्या सहकार्याने हा उपक्रम अधिक प्रभावी होणार आहे.”
प्रभाग सहायक आयुक्त सविता हिले यांनी नागरिकांना आवाहन केले की, “स्वच्छ स्टेशन – सुंदर कल्याण” हे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी व्हावे.
या प्रसंगी ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे, माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के, रवी देवळे, वर्षा कळके, संजय देवरे, सुरेश काळे, वासंकर, देवीचंद अंबादे, उंबरकर, सिलिमकर, रवीदर्शन कराड, रवी हराले, भारत सताळे, सुनिल डाळिंबे आदी मान्यवर उपस्थित होते.













Leave a Reply