The Web Cloud Media

the news on web in leading news website in maharashtra

मोफत हेपिटायटिस – A लसीकरण मोहिमेस प्रारंभ!

कल्याण

केडीएमसीच्या महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व महिला व बालकल्याण विभाग यांचेमार्फत महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत कल्याण पूर्व नेतिवली येथील प्रबोधनकार ठाकरे प्राथमिक शाळा क्रमांक 19 येथे हेपिटायटिस – A या मोफत लसीकरण मोहिमेस आज प्रारंभ करण्यात आला.

मोफत हेपिटायटिस – A लसीकरण मोहिमेस प्रारंभ!

महापालिका शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीतील मुलांना ही लस मोफत देण्यात येणार असून यकृतावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही लस मोफत देण्यात येत असल्याची माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिली.

तसेच शाळांमधील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी पालक मेळावा घेऊन या लसीचे महत्त्व त्यांना विषद करावे असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. प्रबोधनकार ठाकरे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अभ्यास करावा तसेच अभ्यासाव्यतिरिक्त इतर कलागुणही जोपासावेत असे मार्गदर्शन आपल्या भाषणात केले.

कावीळ सारखा दूषित पाणी आणि दूषित अन्न यातून उद्भवणारा विषाणूजन्य आजार प्रतिबंधक हेपिटायटिस ए हे लसीकरण करण्यात येत असून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या सवयी कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे असे प्रतिपादन महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ल यांनी आपल्या भाषणात केले.

हेपिटायटीस ए या लसीकरणाचे दोन डोस विद्यार्थ्यांनी घ्यावयाचे असून पहिल्या लसीकरणानंतर सहा महिन्यांनी दुसरा डोस घ्यावयाचा आहे तसेच महापालिकेच्या इतर शाळांमध्ये देखील पालकांच्या संमतीअंती हे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. दीपा शुक्ल यांनी यावेळी दिली.

या समयी महापालिका उपायुक्त कांचन गायकवाड, संजय जाधव ,वैद्यकीय अधिकारी डॉ. पूर्णिमा ढाके, डॉ. दिपाली मोरे, प्रशासन अधिकारी भारत बोरनारे, समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर, इतर अधिकारी वर्ग, सदर शाळेतील शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *