The Web Cloud Media

the news on web in leading news website in maharashtra

आता निवडणुकीआधी खोटं प्रेम : डॉ. शिंदे यांची टीका

मुंबई

कल्याण–डोंबिवलीतील ६५ अनधिकृत इमारतींमधील हजारो रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली असताना, त्यांना दिलासा देण्यासाठी आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक झाली. नगर विकास विभागाचे प्रधान सचिव व अपर मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्या दालनातील या बैठकीनंतर शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना उबाठा आणि मनसेवर जोरदार टीका केली.

खासदार शिंदे म्हणाले—

“मुंबई महापालिकेत सत्तेत असताना मराठी माणसासाठी काहीच केलं नाही. त्यालाच संक्रमण शिबिरात १०–१५ वर्षे ठेवले. हक्काचे घर देण्याचा विचारही केला नाही. आता निवडणुकीआधी मराठी माणसावर राजकारण… ही ढोंगबाजी लोकांना कळत नाही असं कुणाला वाटतं का?”

६५ इमारतींच्या प्रकरणासाठी दिलासा देणारा उपाय — प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर

कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारती अनधिकृत घोषित असून, न्यायालयाने त्यांना निस्सारणाचे आदेश दिले आहेत. विकासकांकडून फसवणूक झालेल्या या रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत खासदार शिंदे यांनी हाउसिंग सोसायटीची स्थापना, जमिनीचा मालकीहक्क रहिवाशांकडे देण्याची प्रक्रिया, आणि नोंदणीतील तांत्रिक अडचणी सोडवणे यावर सविस्तर चर्चा केल्याचे सांगितले.

ते पुढे म्हणाले —

निम्म्याहून अधिक इमारतींची नोंदणी प्रक्रिया तत्काळ सुरू होऊ शकते.

प्राधान्याने या इमारतींची नोंदणी जलदगतीने पूर्ण करावी.

विकासकांविरोधातील कारवाईची गती वाढवावी.

नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि KDMC यांनी संयुक्त प्रस्ताव तयार करून पुढील मंत्रीमंडळ बैठकीत मांडावा.

आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक संपन्न

बैठकीस आमदार राजेश मोरे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, KDMC आयुक्त अभिनव गोयल, तसेच शिवसेना पदाधिकारी विश्वनाथ राणे, नितीन पाटील, रवी पाटील, रवी म्हात्रे, राजन मराठे, गुलाब वझे, पंढरीनाथ पाटील व सागर जेधे उपस्थित होते.

विरोधकांना डॉ. शिंदेंचा टोला

मराठी माणसाचे राजकारण करणाऱ्यांना लक्ष्य करत खासदार म्हणाले —

“हक्काचे घर देण्याचे काम महायुती सरकार करत आहे. मराठी माणूस महायुतीच्या पाठीशी मजबूत उभा आहे. विरोधकांना पराभव दिसतोय म्हणून ते आता निवडणूक आयोगावर आरोप करत आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *