डोंबिवली
परंपरेचा गंध, संस्कृतीचा ठेका आणि भविष्याकडे धावणारा आत्मविश्वास… डोंबिवलीत सुरू झालेल्या अखिल भारतीय आगरी महोत्सवातून आगरी समाजाची समृद्ध संस्कृती, खाद्यपरंपरा आणि सामाजिक बांधिलकी ठळकपणे समोर आली आहे. नव्या पिढीला परंपरेची ओळख करून देण्याच्या उद्देशाने ‘आगरी युथ फोरम’तर्फे आयोजित या महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात झाला.
माजी कसोटी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण आणि महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी मान्यवरांनी आगरी समाजाच्या संस्कृतीचा, एकतेचा आणि प्रगतीशील दृष्टिकोनाचा गौरव केला.
डोंबिवलीतील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात सुरू झालेला हा २१ वा आगरी महोत्सव १९ डिसेंबरपर्यंत चालणार असून, महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी शरद रा. पाटील आहेत. उद्घाटनप्रसंगी माजी खासदार जगन्नाथ पाटील, प्रल्हाद शास्त्री महाराज आचार्य, गंगाराम शेलार, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, वास्तुविशारद तायशेटे, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, बंडू पाटील, दिनेश म्हात्रे, चंद्रकांत पाटील, सुरेश जोशी, महापालिका सचिव किशोर शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी यांनी आगरी युथ फोरमच्या कार्याचे कौतुक केले. समाजाने शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही आघाडी घ्यावी, असे आवाहन करत २०३० च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत डोंबिवलीतील चार ते पाच खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आमदार रवींद्र चव्हाण यांनी महोत्सवाचे नियोजन व सामाजिक संदेशाचे विशेष कौतुक करत, आगरी समाजाची सर्वांगीण प्रगती होत असल्याचे नमूद केले.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी संत सावळाराम महाराजांपासून प्रेरणा घेण्यासाठी १० एकर जागेत भव्य स्मारक उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली.
महोत्सवाचे अध्यक्ष शरद रा. पाटील यांनी आगरी युथ फोरमच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. कल्याण-डोंबिवलीतील ७८ हजार अनधिकृत इमारतींच्या प्रश्नात समाजासाठी फोरमने घेतलेल्या पुढाकाराची माहिती देत, संत सावळाराम महाराजांच्या स्मारकासाठी १० एकर जागा देण्याच्या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पांडुरंग म्हात्रे यांनी केले.
मान्यवरांना ज्ञानेश्वरी, ५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
संत ज्ञानेश्वरांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त यंदा आगरी महोत्सवाला भेट देणाऱ्या मान्यवरांना ग्रंथराज ज्ञानेश्वरीची प्रत भेट म्हणून देण्यात येणार आहे. तसेच आगरी समाजातील ५० गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष शरद रा. पाटील यांनी दिली.













Leave a Reply