Power by The Web Cloud Media

विशाल शेटे यांना डॉ. आंबेडकर राष्ट्रीय सन्मान २०२५

डोंबिवली

येथील सामाजिक कार्यकर्ते आणि सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक विशाल शेटे यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल “डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सन्मान पदक २०२५” देऊन गौरविण्यात आले.

५४ व्या आंतरराष्ट्रीय विजय दिनानिमित्त आयोजित दलित परिषदेत, दिल्ली येथील राजेंद्र भवन येथे हा भव्य सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र भवन ट्रस्ट, राजेंद्र प्रसाद अकादमी तसेच बाबू जगजीवन राम कला, संस्कृती व साहित्य अकादमी यांच्या वतीने करण्यात आले होते. या निमित्ताने देशभरातील विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.

रस्ता सुरक्षा हे आपले ध्येय मानून विशाल शेटे सातत्याने कार्यरत आहेत. “शून्य अपघात” हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ते शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करतात. त्यांच्या या कार्यामुळे अनेक नागरिकांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत सकारात्मक बदल घडून आला आहे.

कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी केलेले सामाजिक कार्य विशेष उल्लेखनीय ठरले. त्या काळातील योगदानासाठी त्यांना विविध सामाजिक संस्था व संघटनांकडून “कोरोना योद्धा” म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय, “सहकार रत्न पुरस्कार २०२५” देखील त्यांच्या नावावर जमा आहे.

निस्वार्थ भावनेने समाजसेवा करणाऱ्या विशाल शेटे यांना हा मानाचा पुरस्कार डॉ. मीना कुमारी (माजी लोकसभा अध्यक्ष, भारत सरकार) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास खासदार संजय कुमार पासवान, डॉ. एन. एस. खोडा यांच्यासह देशभरातून आलेले मान्यवर व पुरस्कारार्थी उपस्थित होते.

विशाल शेटे यांचा हा सन्मान म्हणजे समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मिळालेली प्रेरणा असून, डोंबिवलीसाठी तो अभिमानाचा क्षण ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *