कल्याण
“आजच्या डिजिटल युगात सतत मोबाईल, लॅपटॉप आणि स्क्रीनसमोर काम केल्यामुळे डोळ्यांवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. हा ताण सुरुवातीला जाणवत नाही, पण वेळेवर तपासणी न केल्यास गंभीर आजारात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे डोळ्यांवरील ताण अजिबात दुर्लक्षित करू नका,” असा स्पष्ट सल्ला वरिष्ठ रेटिना शल्यचिकित्सक डॉ. पुष्पांजली रामटेके यांनी दिला.
प्रेस क्लब कल्याणच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पत्रकारांच्या डोळ्यांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी खडकपाडा येथील ईशा नेत्रालय यांच्या सहकार्याने आयोजित वार्तालाप सोहळ्यात त्या बोलत होत्या. बातमी मिळवण्यासाठी दिवसभर धावणारे पत्रकार स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
“डोळ्यांत जळजळ, कोरडेपणा, डोकेदुखी, धूसर दिसणे ही लक्षणे डोळ्यांवरील ताणाची सुरुवात आहेत. स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणे, दर काही वेळाने डोळ्यांना विश्रांती देणे आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे,” असेही डॉ. रामटेके यांनी सांगितले.

बाल नेत्रतज्ज्ञ डॉ. स्नेहा पेशवाणी
यावेळी बाल नेत्रतज्ज्ञ डॉ. स्नेहा पेशवाणी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “लहान मुलांचे डोळे अत्यंत नाजूक असतात. लहान वयापासूनच मोबाईलचा अति वापर टाळला नाही, तर भविष्यात गंभीर समस्या उद्भवू शकतात.”
दत्ता बाठे
प्रेस क्लब कल्याणचे ज्येष्ठ सदस्य दत्ता बाठे म्हणाले, “डोळे आहेत म्हणूनच आपण जग पाहू शकतो आणि बातम्या देऊ शकतो. डोळ्यांची तपासणी महाग आहे म्हणून दुर्लक्ष करू नका.”
कार्याध्यक्ष कुणाल म्हात्रे यांनी, “उपस्थित मान्यवरांनी दिलेल्या माहितीचा उपयोग करून प्रत्येक पत्रकाराने वेळोवेळी नेत्रतपासणी करावी,” असे आवाहन केले.
या वार्तालाप सोहळ्याप्रसंगी ईशा नेत्रालयच्या वतीने उपस्थित पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत डोळ्यांची तपासणी फॅमिली कार्ड तसेच आय मास्क देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित डॉक्टरांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत शंकांचे निरसन केले.
या वार्तालापप्रसंगी ईशा नेत्रालय खडकपाडा शाखेचे विस्तार अधिकारी गौरव कांबळे, शाखा अधिकारी विशाखा शहा, राजश्री वाघ आदी मान्यवरांचे जेष्ठ सदस्य नवीनभाई भानुशाली, अतुल फडके, सचिन सागरे, राजेश जाधव, रवि चौधरी यांनी स्वागत केले.
या वार्तालापाला ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य, आर. टी. सुरळकर, नाना म्हात्रे, दिलीप पाटणकर, रविंद्र खरात, संतोष होळकर, केतन बेटावदकर, आकाश गायकवाड, चारुशीला पाटील, राजू काऊतकर, सिद्धार्थ कांबळे, नारायण सुरोशी, संभाजी मोरे, उमाकांत चौधरी आदीसह विविध दैनिकाचे आणि वृत्तवाहिनीचे पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्ता बाठे यांनी केले.














Leave a Reply