Power by The Web Cloud Media

व्हिजिट माय पोलीस स्टेशनमध्ये महात्मा फुले चौक पोलीस ठाणे प्रथम

कल्याण

नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील विश्वास अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘व्हिजिट माय पोलीस स्टेशन’ या उपक्रमात महात्मा फुले चौक पोलीस ठाणे यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या ३५ पोलीस ठाण्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे पोलीस आयुक्तालय, ग्लोबल केअर फाउंडेशन आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम २९ नोव्हेंबर २०२५ रोजी ठाणे शहरातील सर्व ३५ पोलीस ठाण्यांमध्ये राबविण्यात आला होता.

या उपक्रमाअंतर्गत कल्याण येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात सर्व वयोगटातील नागरिक, महिला वर्ग, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शाळा–महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. जवळपास अडीच ते तीन हजार नागरिकांनी प्रत्यक्ष पोलीस ठाण्याला भेट देत प्रत्येक विभागाची कार्यपद्धती, कायदे, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीचे आधारवड ॲप, पोलीस मित्र ॲप आणि विविध हेल्पलाईन सेवांची सखोल माहिती घेतली.

पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ अंतर्गत येणाऱ्या या पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व पोलीस अंमलदारांनी नागरिकांशी उत्कृष्ट संवाद साधत पोलीस कार्यपद्धतीबाबतची भीती दूर करण्यास मोलाचे योगदान दिले. नागरिकांमध्ये कायदेशीर जागरूकता निर्माण करणे आणि पोलीस प्रशासनाबाबत असलेले गैरसमज दूर करणे, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश यशस्वीपणे साध्य झाल्याचे चित्र दिसून आले.

या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ग्लोबल केअर फाउंडेशन आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम यांच्या वतीने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

— प्रतिनिधी, कल्याण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *