Power by The Web Cloud Media

आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया २०२६–२७ साठी सुरू

शाळा नोंदणी व पडताळणीचा पहिला टप्पा प्रारंभ

ठाणे
शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांवर प्रवेश देण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ पासून सुरू करण्यात आला आहे.

या टप्प्यात आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांची ऑनलाईन नोंदणी तसेच शाळा पडताळणी (School Verification) करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरील लिंक कार्यान्वित करण्यात आली आहे.

शाळा पडताळणी करताना बंद झालेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा, अनधिकृत तसेच स्थलांतरित (Relocated) झालेल्या शाळा या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्यात येणार नसल्याची स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.
तसेच, शाळेला ज्या शिक्षण मंडळाची मान्यता आहे, त्याच मंडळाची निवड नोंदणीदरम्यान करण्यात आली आहे का, याची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणतीही चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती नोंदवली जाणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.

दि. ९ जानेवारी ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत सर्व संबंधित शाळांनी नोंदणी व शाळा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद ठाणे बाळासाहेब राक्षे यांनी दिले आहेत.
आरटीई प्रवेश प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व महापालिका, पंचायत समिती व संबंधित शिक्षण विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

समाजातील दुर्बल घटकातील बालकांना दर्जेदार शिक्षण व समान संधी मिळावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश असून शाळा प्रशासनाने दिलेल्या वेळेत गांभीर्याने कार्यवाही करावी, असे शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *