कल्याण पूर्वेतील ‘पुणेरी टाईप’ पाटी ठरतेय चर्चेचा विषय
कल्याण
केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असताना, कल्याण पूर्वेतील एका इमारतीबाहेर लावण्यात आलेल्या ‘पुणेरी टाईप’ पाटीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोणत्याही व्यक्तीला उद्देशून थेट आवाहन न करता, विनोदी आणि बोचऱ्या शैलीत मांडलेला संदेश सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
पुणेरी पाट्या म्हणजे थेट, स्पष्ट आणि कुठलाही मुलाहिजा न ठेवता दिलेला संदेशही ओळख सर्वपरिचित आहे. फेरीवाले, अनावश्यक भेट देणारे किंवा वारंवार त्रास देणाऱ्यांसाठी अशा पाट्या अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र, कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक 12 मधील एका निवासी इमारतीतील घराबाहेर लावलेली पाटी तिच्या वेगळ्या आशयामुळे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
या पाटीवर लिहिले आहे की,
“दारावरची बेल वाजवून त्रास देऊ नका. आमच्या घरातीलच नव्हे, तर संपूर्ण इमारतीतील रहिवाशांचे मत या उमेदवारालाच आहे.”
संदेशात कोणत्याही प्रकारचे आवाहन, प्रचार किंवा मत मागण्याचा थेट उल्लेख नसून, तो वैयक्तिक मतप्रदर्शनाच्या स्वरूपात असल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे, ही पाटी पाहून एका राजकीय प्रतिस्पर्ध्यानेही याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत, या कल्पकतेचे कौतुक केल्याची चर्चा आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून दाखवलेली ही खिलाडूवृत्ती नागरिकांमध्येही चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, या पाटीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, अनेकांनी याला “पुणेरी स्टाईलमधील सूचक संदेश” असे म्हटले आहे, तर काहींनी “डोअर-टू-डोअर प्रचारावर विनोदी भाषेत व्यक्त केलेली भूमिका” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
एकंदरीत, केडीएमसी निवडणुकीच्या गडबडीत कल्याण पूर्वेतील ही ‘पुणेरी टाईप’ पाटी कोणताही थेट प्रचार न करता, केवळ विनोद आणि वैयक्तिक मतप्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.













Leave a Reply