Power by The Web Cloud Media

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला सेलिब्रिटी टच!

ठाणे जिल्ह्यात गावोगावी जनजागृतीचा जल्लोष

ठाणे | News on Web

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठाणे जिल्हा परिषदेकडून आयोजित करण्यात आलेल्या सेलिब्रिटी गावभेटी कार्यक्रमांना भिवंडी, शहापूर आणि मुरबाड तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या अभियानाच्या प्रचारासाठी अभिनेत्री शिवाली परब आणि अभिनेते पृथ्वीक प्रताप यांनी रविवारी भिवंडी तालुक्यातील डोहळे, शहापूर तालुक्यातील भावसे–खोस्ते आणि मुरबाड तालुक्यातील खेवारे या गावांना भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अभिनेत्री शिवाली परब यांनी ग्रामस्थांना आवाहन केले की, स्पर्धात्मक स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या या अभियानात प्रत्येक गावाने सक्रिय सहभाग घ्यावा व विकासकामांतून बक्षिसे मिळवावीत.

अभिनेते पृथ्वीक प्रताप यांनी सांगितले की, शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग अत्यावश्यक आहे. अधिकारी व कर्मचारी यंत्रणा सज्ज आहे; आता पुढाकार गावकऱ्यांचा असावा.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि पाणीपुरवठा या मूलभूत सुविधांसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करत, समृद्ध गावनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर सहभागाचे आवाहन केले.

🏡 तालुकानिहाय ठळक घडामोडी

🔹 भिवंडी – डोहळे ग्रुप ग्रामपंचायत

जिल्हा परिषद शाळेत परसबाग व विकसित बागेची पाहणी

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा गृहप्रवेश

रुग्णवाहिकेचे उद्घाटन

महिला बचत गटांचे उत्पादन प्रदर्शन व विक्री

विकासकामांची माहिती देणारी चित्रफीत सादरीकरण

🔹 शहापूर – ग्रामपंचायत भावसे–खोस्ते

समाज हॉलमध्ये औक्षण व सन्मान

पारंपारिक आदिवासी गौत्या नृत्य

डिजिटल शाळा व रेन वॉटर हार्वेस्टिंग उद्घाटन

जलतारा, शोषखड्डा, वृक्षारोपण व सिंचन प्रकल्प पाहणी

🔹 मुरबाड – ग्रामपंचायत खेवारे

केंद्रशाळेत डिजिटल शाळेचे उद्घाटन

शोभायात्रा व महिला प्रेरणा संघाची परसबाग

डास निर्मूलन व अनिष्ट रूढी निर्मूलन फलक उद्घाटन

जलतारा, वृक्षारोपण, श्रमदान व ग्रामस्थांशी संवाद

या कार्यक्रमास आमदार, माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *