Power by The Web Cloud Media

सांगलीत निरंकारी संत समागमाचा शुभारंभ २४ पासून

एकत्वभाव, शिस्त व सेवाभावातून व्यापक तयारी पूर्णत्वाकडे

सांगली

प्रेम, सेवा आणि एकत्वाच्या पावन भावनांनी ओतप्रोत असलेला महाराष्ट्रातील ५९वा निरंकारी संत समागम येत्या २४ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत सांगली येथे परमपूज्य सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज तसेच निरंकारी राजपिता रमितजी यांच्या दिव्य सान्निध्यात श्रद्धा व भव्यतेने संपन्न होणार आहे. या तीन दिवसीय सत्संग समारंभाच्या तयारी अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून, समर्पित श्रद्धाळू व निरंकारी सेवादार पूर्ण निष्ठा, शिस्त आणि निष्काम सेवाभावाने समारंभस्थळास सुसज्ज व आकर्षक स्वरूप देत आहेत.

हा दिव्य संत समागम सांगली शहरालगतच्या सांगलवाडी परिसरात सुमारे ४०० एकरांच्या विस्तीर्ण व भव्य मैदानावर आयोजित करण्यात येत आहे. या आध्यात्मिक सोहळ्यांतर्गत दररोज दुपारी २.३० वाजता मुख्य सत्संग कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. देश-विदेशातून उपस्थित राहणारे संत, वक्ते, गीतकार व कवी आपल्या विचारांद्वारे, गीतांद्वारे व रचनांद्वारे ईश्वर-परमात्मा आणि सद्गुरूंप्रती श्रद्धाभाव व्यक्त करतील. प्रत्येक दिवसाचा समारोप रात्री ९ वाजता सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराजांच्या प्रेरणादायी आशीर्वचनांनी होणार असून, ती सर्व भाविकांसाठी आध्यात्मिक मार्गदर्शनाचा आधार ठरेल.

यंदाच्या महाराष्ट्र प्रादेशिक संत समागमासाठी ‘आत्म-मंथन’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. आत्मबोध, आत्मशुद्धी आणि मानवी मूल्यांच्या जागृतीच्या दिशेने ही संकल्पना संपूर्ण संत समागमाला गहन व अर्थपूर्ण आध्यात्मिक प्रवाह प्रदान करीत आहे. गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून आलेल्या भाविकांच्या निष्काम व निःस्वार्थ सेवेमुळे समागमस्थळ आज सुव्यवस्थित, भव्य व आकर्षक शामियान्यांनी सजलेल्या नगरीचे रूप घेत आहे. सद्गुरू माताजींच्या अमूल्य शिकवणी जीवनात आत्मसात करत, सर्व वयोगटांतील श्रद्धाळू शिस्तबद्धतेने व स्वयंप्रेरणेने सेवाकार्यात सातत्याने सहभागी होत आहेत.

या सेवांचे प्रेरणादायी व देखणे स्वरूप सर्वसामान्यांसाठी आदर्शवत ठरत आहे. भक्ती, प्रेम आणि समर्पणातून साकारलेली ही सेवा अशी आध्यात्मिक अनुभूती देणारी आहे, जी शब्दांच्या पलीकडची आहे. मानवकल्याणाच्या उद्देशाने आयोजित या दिव्य संत समागमात सहभागी होण्यासाठी जनसामान्यांना पथनाट्य, बॅनर्स तसेच सांगलीदृमिरज महानगरातील विविध भागांत आयोजित खुले सत्संगांच्या माध्यमातून आमंत्रित करण्यात येत आहे. अधिकाधिक नागरिक व श्रद्धाळूंनी या आध्यात्मिक उत्सवात सहभागी होऊन निरंकार ईश्वराच्या आश्रयाने आपले जीवन अधिक सार्थक करावे, हा यामागचा उद्देश आहे.

या संत समागमासाठी येणार्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी निवासी तंबू, भव्य लंगर व्यवस्था (सामूहिक भोजन), कॅन्टीन, औषधालय, सुरक्षा यंत्रणा, नियोजित वाहनतळ तसेच रेल्वे स्थानक व बस स्थानकांहून ये-जा करण्यासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. समागम परिसरात स्वच्छता व सुव्यवस्थेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. निरंकारी प्रकाशन विभागामार्फत समागमस्थळी आध्यात्मिक साहित्याचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. यासोबतच संत निरंकारी मिशनचा इतिहास व मानवी सेवाकार्यांचे दर्शन घडविणारी चित्रमय निरंकारी प्रदर्शनी तसेच बालकांसाठी विशेष भव्य बाल प्रदर्शनी आयोजित करण्यात येत असून, त्यामध्ये सर्जनशील व शैक्षणिक कार्यशाळांचा समावेश असणार आहे. हे उपक्रम बालमनाच्या सर्वांगीण विकासास पूरक ठरणार आहेत. या मानवतेच्या महासंगमात सर्व श्रद्धालू भक्त, सज्जन नागरिक व महात्म्यांना सादर आमंत्रण देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *