डोंबिवली
मुंबई म्हणजे कला, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा श्वास. या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानला जाणारा काला घोडा महोत्सव यंदा डोंबिवली शहरात साकार झाला. जे एम एफ शिक्षण संस्थेच्या ब्रह्मा रंगातलाय प्रांगणात दिनांक २० जानेवारी रोजी काला घोडा महोत्सवाची भव्य आणि देखणी प्रतिकृती मोठ्या उत्साहात पार पडली.
उभरत्या कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेल्या जे एम एफ शिक्षण संस्थेत संपूर्ण आठवडाभर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. त्याचाच एक भाग म्हणून १९ जानेवारी रोजी जे एम एफ रोजगार मेळावा (Job Mela) आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ३३ नामांकित कंपन्या सहभागी झाल्या असून ३५० हून अधिक उमेदवारांनी उपस्थिती लावली.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सरस्वती, नटराज व गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्या व सुप्रसिद्ध कलाकार बॉस्की मॅडम यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मनापासून कौतुक केले.
जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा व विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला पंख देत हस्तकला, प्रकल्प, कॅनव्हास पेंटिंग सादर केली. हस्तकलेने तयार केलेला भव्य काला घोडा संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. संपूर्ण महोत्सव चल-चित्रासारखा जिवंत भासत होता.
इयत्ता सहावीत शिकणारा विद्यार्थी अर्णव डोंगरे याने गणपती बाप्पाचे सुंदर चित्र रेखाटले, तर मूर्तिकार मूर्ती घडवण्यात मग्न होते. मेंदी, रंगभरण, चित्रकला यामध्ये कलाकार तल्लीन झाले होते. विशेष म्हणजे प्रमुख पाहुण्या बॉस्की मॅडम यांनी स्वतः संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांचे चित्र रेखाटले.

कलाशिक्षिका दीपा तांबे, सपना यन्नम, स्नेहा डोळे, अभिषेक देसाई, नरेश पिसाट यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रकल्प साकारले. संपूर्ण प्रांगण विविध कलात्मक साहित्याने सजले होते.
ब्रह्मा रंगातलाय मंचावर सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत वाढली. संगीत शिक्षिका श्रेया कुलकर्णी आणि गायक शिक्षक नितेश मेस्त्री यांनी नाट्यसंगीत सादर केले. इयत्ता चौथीतील जाई हिने कथक नृत्यातून गणेश वंदना सादर केली. कलाशिक्षक अभिषेक देसाई व प्रमोद पगारे यांच्या दिग्दर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नृत्यनाट्य सादर केले. पदवी महाविद्यालयाचे प्रा. योगेश शिरसाट यांनी वासुदेवाचे रूप धारण करत ‘वासुदेव आला’ हे नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. इयत्ता सातवीतील कार्तिक याने तबल्याच्या सुरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कविता गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिकांनी काव्यवाचन सादर केले. डोंबिवलीतील अनेक बाहेरील शाळांनीही या महोत्सवाला भेट देत आनंद लुटला.
“कला माणसाला जिवंत ठेवते, तर कलाकार इतरांना जिवंत ठेवतो,” असे सांगत संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे यांनी कलाकारांच्या मेहनतीचे कौतुक केले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
संस्थापिका सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी, “काला घोडा हे नाव जरी महोत्सवाचे असले, तरी आमच्या विद्यार्थ्यांची घोडदौड चेतक घोड्यासारखी आहे,” असे भावनिक उद्गार काढले.
खाद्यपदार्थांच्या रेलचेलीतून उपस्थितांनी मेजवानीचा आस्वाद घेतला. खजिनदार जान्हवी कोल्हे, संस्थापक व संस्थापिका तसेच पदाधिकाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रेया कुलकर्णी व प्रो. एकनाथ चौधरी यांनी केले. वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.













Leave a Reply