Power by The Web Cloud Media

“नागरिकांचा विश्वास डळमळीत होऊ देणार नाही!”

कल्याण डोंबिवलीच्या पहिल्या महिला महापौर हर्षाली चौधरींचा ठाम निर्धार

कल्याण | News On Web

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. महापालिका सभागृहात पीठासीन अधिकारी आंचल गोयल (जिल्हाधिकारी, मुंबई शहर) यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली.

वैध नामनिर्देशन अर्जांच्या आधारे हर्षाली विजय चौधरी यांची महापौर म्हणून, तर राहुल वसंत दामले यांची उपमहापौर म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली.

महापौर पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बोलताना हर्षाली चौधरी म्हणाल्या,

“नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही. माझ्यावर दिलेल्या जबाबदारीचे सोनं करेन. जनतेची कामे प्राधान्याने पूर्ण करणे हेच माझे पहिले उद्दिष्ट असेल.”

त्यांनी सर्व नगरसेवक, अधिकारी व नागरिकांनी एकत्र येऊन समन्वयाने शहराच्या विकासासाठी काम करण्याचे आवाहन केले.

यावेळी नवनिर्वाचित उपमहापौर राहुल दामले यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले,

“एकमेकांच्या हातात हात घालून, राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देत कल्याण डोंबिवलीला पुढे नेऊया.”

या निवड प्रक्रियेनंतर सभागृहात अभिनंदनाचा सूर उमटला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह उपस्थित नगरसेवकांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी आमदार सुलभाताई गायकवाड, आमदार राजेश मोरे, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

नव्या नेतृत्वाकडून शहराच्या विकासाबाबत मोठ्या अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केल्या असून, “विश्वास, समन्वय आणि विकास” ही त्रिसूत्री प्रत्यक्षात उतरते का, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *