ठाणे जिल्ह्यात २.२८ लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार
ठाणे
राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मंगळवारपासून सुरू होत असून, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात परीक्षा प्रशासनाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात यंदा दहावीच्या परीक्षेसाठी ३२६ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, १ लाख १९ हजार ७४२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर, बारावीच्या परीक्षेसाठी १९३ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, १ लाख ८ हजार ९९८ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी २० परिरक्षक केंद्रांमार्फत संपूर्ण यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
मंगळवारी सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेची लगबग सोमवारपासूनच परीक्षा केंद्रांवर पाहायला मिळाली. शाळा व महाविद्यालयांमध्ये बाकांवर आसन क्रमांक टाकणे, बैठक व्यवस्था पूर्ण करणे आदी कामे सुरू होती. तसेच विद्यार्थीही परीक्षा केंद्रांवर प्रत्यक्ष जाऊन हॉल तिकीटवरील क्रमांक संबंधित केंद्रावर आहे की नाही, याची खातरजमा करताना दिसून आले.
भरारी पथक तैनात
बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि पारदर्शक व्हाव्यात यासाठी ठाणे जिल्हा शिक्षण विभागामार्फत सहा भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली तालुकानिहाय भरारी पथके नेमण्यात आली असून, परीक्षा केंद्रांवर या पथकांचे विशेष लक्ष असणार आहे.
भरारी पथकांमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, तज्ज्ञ शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक तसेच महिला विशेष पथकाचा समावेश करण्यात आला आहे.













Leave a Reply