भारतीय संस्कृतीचा सन्मान आणि पालकांप्रती कृतज्ञतेची अभिव्यक्ती
उल्हासनगर
भारतीय संस्कृतीतील मातृ-पितृ पूजेची परंपरा जपत एस.एस.टी. कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘पेरेंटाईन डे’ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मनावर भारतीय संस्कृतीची मूल्ये रुजवण्यासाठी विविध अभिनव उपक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयाने गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा यंदाही कायम ठेवत पालकांविषयी आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची अनोखी अभिव्यक्ती घडवून आणली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांची मनोभावे पूजा-अर्चा करून आरती केली, साष्टांग दंडवत घालत आशीर्वाद घेतला. आपल्या मनातील प्रेम आणि कृतज्ञतेच्या भावना विद्यार्थ्यांनी सर्वांसमक्ष व्यक्त केल्या. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य आणि पथनाट्याद्वारे पालकांप्रती असलेल्या विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यासोबतच विद्यार्थ्यांना पालकांची काळजी घेण्याचे आवाहनही केले. भावनांनी ओतप्रोत भरलेल्या या वातावरणात अनेक पालक साश्रूनयनांनी भारावून गेले.
असा अनोखा सोहळा प्रथमच पाहिला, आपल्या पाल्याने सर्वांसमक्ष व्यक्त केलेले प्रेम आणि आदर मनाला स्पर्शून गेले, अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेची कौशल्ये विकसित व्हावीत या उद्देशाने महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थीनीने स्वतः बनविलेल्या पौष्टिक लाडूंचा स्टॉल लावण्यात आला. योग्य आहाराचे महत्त्व पटवून देत आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून प्रमोद ढोकळे, विशेष अतिथी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सचे वाणिज्य विभाग प्रमुख व एनएसएसचे मुंबई उपनगर जिल्हा समन्वयक डॉ. निखिल कारखानिस, लोकल बंधन मीडिया हाऊसच्या शार्मिन मिरजकर आणि मृणाली ओरसकर, महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी, आयक्यूएसी समन्वयक डॉ. खुशबू पुरस्वानी, ट्रस्टी डॉ. हिना मुलपानी तसेच अनेक पालक आणि विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, डीएलएलई, सांस्कृतिक समिती, स्टुडंट्स कौंसिल, सीबीक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक, विद्यार्थी व स्वयंसेवकांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. भारतीय संस्कृतीतील ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव’ या मूल्यांचा जागर करत एस.एस.टी. महाविद्यालयाने ‘पेरेंटाईन डे’च्या माध्यमातून प्रेम, आदर आणि संस्कारांची सुंदर परंपरा अधिक दृढ केली.













Leave a Reply