जागतिक डायबेटिस परिषदेत डोंबिवलीचा झेंडा
डोंबिवली
डोंबिवलीतील आयुर्वेदिक मधुमेह तज्ज्ञ व डायबेटीस रिव्हर्सल कोच डॉ. महेश पाटील यांनी हैदराबाद येथे झालेल्या Diabetes India 2026 – World Congress of Diabetes & Obesity या आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधनपत्र सादर करत शहराचा मान उंचावला आहे. १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान HICC (Hyderabad International Convention Centre) येथे झालेल्या या परिषदेत देश-विदेशातील अग्रगण्य मधुमेह तज्ज्ञ सहभागी झाले होते.
“Diabetes 360° : Bridging Science & Sustainability” या संकल्पनेवर आधारित परिषदेत डॉ. पाटील यांनी जीवनशैली आधारित मधुमेह नियंत्रण या विषयावर आपले निष्कर्ष मांडले. संतुलित आहार, नियोजित उपवास पद्धती, नियमित व्यायाम, ताण-नियंत्रण आणि शिस्तबद्ध दिनचर्या या घटकांच्या समन्वयातून HbA1c मध्ये लक्षणीय घट साध्य करता येते, हे त्यांनी प्रत्यक्ष क्लिनिकल अनुभव व आकडेवारीसह स्पष्ट केले.
औषधांवर पूर्ण अवलंबित्व न ठेवता योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाखाली मधुमेह प्रभावीपणे नियंत्रित करता येतो, हा त्यांच्या सादरीकरणाचा मुख्य संदेश होता. भारतीय रुग्णांच्या जीवनशैलीचा सखोल अभ्यास करून विकसित केलेल्या या 360° फ्रेमवर्कची परिषदेत विशेष दखल घेण्यात आली.
या परिषदेत डॉ. व्ही. मोहन, डॉ. अनुप मिश्रा, डॉ. शशांक जोशी, डॉ. एस.आर. अरविंद यांसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ उपस्थित होते. तसेच International Diabetes Federation, EASD, PCDE आणि International Atherosclerosis Society यांच्या संयुक्त सत्रांमुळे परिषदेला जागतिक महत्त्व प्राप्त झाले.
मधुमेह व्यवस्थापनात “रुग्ण सक्षमीकरण” ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करत, दीर्घकालीन आरोग्य टिकवण्यासाठी जीवनशैली-आधारित हस्तक्षेप आवश्यक असल्याचे डॉ. पाटील यांनी अधोरेखित केले.
डोंबिवलीसह परिसरातील रुग्णांसाठी ही अभिमानास्पद बाब मानली जात असून, स्थानिक पातळीवर जीवनशैली आधारित आरोग्य चळवळ अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.













Leave a Reply