Power by The Web Cloud Media

‘रमाई’सह प्रा. आशालता कांबळे यांची तीन पुस्तके प्रकाशित

मुंबई, दि. 17 फेब्रुवारी 2026

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या, लेखिका-कवयित्री व संशोधक प्रा. आशालता कांबळे यांच्या वैचारिक लेखनाचा महत्त्वपूर्ण ठेवा वाचकांसमोर येत आहे. त्यांच्या ‘रमाई : एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व’, ‘दृष्टी’ आणि ‘आईची पत्रे’ या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शनिवार, 21 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता दादर (पूर्व) येथील डॉ. आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे आयोजन ‘दि पिपल्स इम्प्रुवमेन्ट ट्रस्ट’च्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भिमराव य. आंबेडकर भूषविणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे, समाजवादी नेते कपिल पाटील, रमाई मासिकाच्या संपादक प्रा. डॉ. रेखा मेश्राम आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई धाकतोडे हे प्रमुख वक्ते म्हणून पुस्तकांवर भाष्य करणार आहेत. सूत्रसंचालनाची जबाबदारी पत्रकार व लेखिका विनिशा धामणकर-पवार पार पाडणार आहेत.

प्रा. कांबळे या आंबेडकरी विचारधारेवरील वैचारिक लेखनासाठी ओळखल्या जातात. ‘रमाई : एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व’ या ग्रंथात त्यांनी संशोधनाधिष्ठित दृष्टिकोनातून रमाईंच्या कणखर व स्वाभिमानी व्यक्तिमत्त्वाचे वेगळे पैलू उलगडले आहेत. ‘दृष्टी’ या पुस्तकात दैनिक सम्राट व दैनिक महानायकमध्ये प्रकाशित प्रासंगिक लेखांचा संग्रह आहे. तर ‘आईची पत्रे’मध्ये कुमारवयीन मुलींसाठी मार्गदर्शक, संस्कारक्षम पत्रांचा समावेश असून ते पालक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

आंबेडकरी विचारसरणीच्या विविध आयामांना स्पर्श करणारे हे लेखन अभ्यासक, संशोधक आणि साहित्यप्रेमींसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. संविधान मूल्यांवर आधारलेल्या या साहित्य सोहळ्यास विद्यार्थी, संशोधक आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *