Power by The Web Cloud Media

प्रोजेक्ट अमृत अंतर्गत ५० पेक्षा अधिक जलस्रोतांची स्वच्छता

कल्याण

प्रोजेक्ट अमृत अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील २५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ९३० शहरांमधील १६०० हून अधिक ठिकाणी २२ फेब्रुवारी रोजी यशस्वीरीत्या करण्यात आले. सुमारे १२ लाख स्वयंसेवकांनी यात सहभाग नोंदविला. हा उपक्रम केवळ पर्यावरणीय प्रयत्न नव्हता; तर अध्यात्म, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम होता. या माध्यमातून जनमानसात कर्तव्यभाव आणि जागरूकतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होईल.

या महा अभियाना अंतर्गत ठाण्यातील ब्रह्माळा तलाव, तुर्फेपाडा तलाव (ब्रह्मांड), मुंब्रा येथील खिडकाळेश्वर महादेव मंदिर, डोंबिवली खाडी साईड, गणपती तलाव (गोग्रासवाडी), खदान तलाव (उल्हासनगर), महागणपती तलाव (टिटवाळा), माऊली तलाव (सोनारपाडा), कान्हेरे गांव तलाव, वारली देवी तलाव (भिवंडी), गौरीपाडा तलाव व आदिवली तलाव (कल्याण), सावर्णे काळू नदी किनारा, पाचवा मैल (भिसोळ) नदी किनारा, कसारा सरोवर, गणेश घाट (भातसई), गणेश घाट (नवापाडा-ठाकुर्ली) तसेच गंगा देवस्थान (शहापुर), खेनी गांव इत्यादि ठिकाणांची सफाई करण्यात आली. या व्यतिरिक्त मुंबई, नवी मुंबई व वसई-विरार भागामध्येही अनेक चौपाट्या, सरोवरे, जेट्टी, नदी किनारे व तलावांची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमामध्ये ठाणे, डोंबिवली, उल्हासनगर महानगरपालिका तसेच बदलापुर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागांनी मोलाचे सहकार्य केले.

 

बाबाजींची शिकवण ही केवळ स्मरण करायची नसून ती जीवनात अंगीकारण्यासाठी आहे. खरी श्रद्धांजली ही शब्दांनी नव्हे, तर कृतीतून अर्पण केली जाते. आपण त्यांच्या अनुयायी असल्याचा दावा करीत असू, तर प्रेम, सेवा, करुणा आणि समदृष्टी यांसारख्या मूल्यांचा स्वीकार आपल्या दैनंदिन जीवनात झाला आहे का, याचे आत्मपरीक्षण आवश्यक आहे. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांचे संपूर्ण आयुष्य मानवकल्याणासाठी समर्पित होते. सेवा, सुमिरण आणि सत्संग हेच जीवनाचे अधिष्ठान असल्याचा त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच सुसंगत आहे. भक्ती ही केवळ बोलण्यापुरती मर्यादित न राहता ती आचरणात दिसली पाहिजे.

सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज, दिल्ली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *