Power by The Web Cloud Media

कल्याणमध्ये ‘अनेकता में एकता’चा जल्लोष

गुढी पाडव्याच्या स्वागतयात्रेत भारतीय संस्कृतीचा भव्य संगम

कल्याण

कल्याण नगरीत यंदाचा गुढी पाडवा केवळ सण न राहता, भारतीय संस्कृतीचा भव्य उत्सव ठरणार आहे. ‘अनेकता में एकता’ या संकल्पनेवर आधारित नववर्ष स्वागतयात्रा गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ६ वाजता मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली आहे.

भारतातील विविध राज्यांची भाषा, पेहराव, लोककला आणि परंपरा हीच आपली खरी ओळख आहे आणि हाच वारसा एका रंगमंचावर आणण्याचा प्रयत्न या स्वागतयात्रेतून केला जाणार आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक लेझीम आणि ढोल-ताशा पथकांसोबतच इतर राज्यांतील लोकनृत्ये, वेशभूषा आणि आकर्षक चित्ररथ हे यंदाचे खास आकर्षण असणार आहे.

यात्रेची सुरुवात पारंपरिक गुढीपूजनाने होईल. संपूर्ण शहर रांगोळ्या, फुलांची सजावट आणि भगव्या ध्वजांनी सजून उठणार आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत, नववर्षाचे स्वागत उत्साहात करतील.

मार्गावर ठिकठिकाणी उभारलेल्या स्वागत मंचांवर विविध प्रांतांच्या संस्कृतीचे सादरीकरण केले जाईल. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘जय श्रीराम’च्या घोषात ही यात्रा शहरातून मार्गक्रमण करणार आहे, ज्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा स्पष्ट संदेश दिला जाईल.

या सोहळ्यास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल आणि महापौर ॲड. हर्षाली चौधरी (थविल) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष डॉ. सुश्रुत वैद्य, सचिव अमोल जोशी, कोषाध्यक्ष दीपक चौधरी, सदस्य अ‍ॅड. निखिल बुधकर तसेच जैन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जयंतीलाल कोठारी, सचिव धरणेन्द्र मेहता आणि स्वागतयात्रा समितीचे अध्यक्ष मदन शंकळेशा यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

“आपली संस्कृती, आपला अभिमान” या भावनेतून कुटुंबासह या सोहळ्यात सहभागी व्हा आणि विविधतेतून एकतेचा उत्सव साजरा करा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

वेळ: सकाळी ६:०० वाजता

प्रारंभ स्थळ: कमिशनर बंगला, सिंडीकेट, कल्याण. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *