डोंबिवलीत उघडकीस आला भन्नाट गुप्त कप्पा
डोंबिवली
डोंबिवलीत एक धक्कादायक आणि तितकाच चतुराईने आखलेला गुन्हेगारी प्रकार उघडकीस आला आहे. बाहेरून अगदी साधा दिसणारा चपलांचा स्टँड आतून मात्र धोकादायक शस्त्रसाठ्याचं गुप्त ठिकाण बनवण्यात आला होता.
गुन्हे शाखा आणि मानपाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कुख्यात ‘रील स्टार’ सुरेंद्र पाटील याच्या घरावर धाड टाकली. झडती दरम्यान पोलिसांना सुरुवातीला काहीच संशयास्पद आढळलं नाही. मात्र बारकाईने तपास करताना चपलांच्या स्टँडमध्ये बनवलेला एक गुप्त कप्पा त्यांच्या लक्षात आला आणि इथूनच संपूर्ण प्रकरणाला थरारक वळण मिळालं. या गुप्त कप्प्यातून तब्बल 7 पिस्तूल, 370 जिवंत काडतुसे, तसेच तलवार आणि चॉपरसारखी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा घरात लपवून ठेवण्यात आल्याने पोलिसही काही काळ स्तब्ध झाले.
विशेष म्हणजे, हा कप्पा इतक्या शिताफीने तयार करण्यात आला होता की, साधारण पाहणाऱ्याला तो पूर्णपणे नजरेआड राहील. त्यामुळे हा साठा कित्येक दिवस कोणाच्याही लक्षात आला नव्हता, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या पोलिसांकडून या शस्त्रसाठ्याचा स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. हा साठा नेमका कुठून आला, यामागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का, आणि यामागे कोणताही मोठा कट तर नव्हता ना, या सर्व बाबींचा तपास केला जात आहे.
एकूणच, ही कारवाई डोंबिवलीतील वाढत्या गुन्हेगारीवर मोठा आघात मानली जात असून, पुढील तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.













Leave a Reply