April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

आज शब्द निःशब्द झाले

जेव्हा जेव्हा दुःखाचे मळभ येतील तेव्हा तेव्हा हाच लतादीदीचा आवाज साथ देणार हे निश्चित... ज्या निसर्गाने लतादीदींचा आवाज आम्हाला दिला... त्या निसर्गाचे शतशः आभार... त्याच निसर्गाने त्यांना देह रुपाने परत नेले... आज शब्द निशब्द झाले आहेत...

माझा मित्र प्रविंद दवणे याचे ‘स्वरमंगेश’ नावाचे नवचैत्यन्य प्रकाशनने काढलेले पुस्तक आले होते. प्रवीण भाषण करत असताना त्याच्या पुस्तकातले अनेक प्रसंग अक्षरशः डोळ्यासमोर दिसत होते, लता मंगेशकर याना पहिल्यांदा बॉम्बे लॅबमध्ये आम्ही भेटलो तिथपासून लतादीदींनी त्याच्या ‘माझा छकुला’ या चित्रपटापर्यंतच्या आठवणी जाग्या झाल्या.

ह्या पुस्तकात बऱ्याच आठवणी, प्रसंग आहेत. ते तुम्ही वाचणार आहातच. कवी प्रवीण दवणे त्याची अनेक शेकडो गाणी अनेक नामवंतांनी गायली. लता मंगेशकर यांच्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टीकोन अत्यंत वेगळा आहे आणि असणारच कारण एकत्र गाणी केली आहेत. परंतु, आमच्यासारखी सामान्य माणसे लता मंगेशकर यांच्याकडे कसे बघतात आम्हाला त्याच्याकडून काय मिळाले ह्याचा विचार करताना एकच गोष्ट जाणवते त्यांच्या गाण्यामुळे आम्हा सामान्य माणसांचे जीवन सुसह्य झाले हे निश्चित आणि निर्विवाद आहेत.

सर्व काळज्या, दुःख त्यात विरून गेली आणि आम्ही परत जीवन जगू शकलो ते त्यांच्या गाण्यामुळे. अर्थात, किशोरकुमार, महमंद रफी, मुकेश अशा अनेक गायकांमुळे आम्ही आमचे जीवनमान वाढवू शकलो. आमच्या जीवनाला अर्थ निर्माण झाला. जर लता मंगेशकर जन्मालाच आल्या नसत्या तर ? असा प्रश्न मनात आला की अस्वस्थ होते. आजही मन शांत करण्यासाठी त्यांच्या गाण्याची गरज निर्माण झाली आहे, उलट मी म्हणेन आज धकाधकीच्या दिवसात तोच एक आराम असतो मेंदूला आणि मनाला, अर्थात हे तरुण पिढीला निश्चित पटेल, साधे उदाहरण घ्या मुले गाण्याच्या भेंड्या खेळताना आजही कुठली गाणी म्हणतात ह्याचा नीट विचार करा. लता मंगेशकर याचे गाणे आज आपली खरेच गरज आहे. हजारो गाणी त्यांनी गायली, बीस साल बाद मधील गाणे असो किंवा दिलवाले दुल्हनियामधील गाणे असो किंवा दिल तो पागल है मधील गाणी आजही आपले मन प्रसन्न करतात. एक चैतन्य निर्माण करतात.

खरेच ‘लता मंगेशकर’ यांच्या गाण्यांनी आपण तृप्त होतो… परंतु ती तृप्तता आपल्याला नवीन संजीवनी देत रहाणार. जेव्हा जेव्हा आपण मूडमध्ये नसलो की परत-परत त्यांची गाणी ऐकतो. परंतु ती सतत ऐकावीशी वाटतात ह्यात एक वेगळेच गूढ आहे हे मला नेहमी जाणवते. सुदैवाने मला त्यांची काही रेकॉर्डिंग्स, काही परफॉर्मन्स जवळून बघण्यास, ऐकण्यास मिळाले. ह्यामुळे स्वतःला भाग्यवान समजतो. त्यांच्या अनेकवेळा स्वाक्षऱ्या घेतल्या त्यांचे अनेक वेळा फोटो काढले, हौस म्हणून. कारण तशी संधी मिळत गेली ती माझ्या प्रवीण दवणे या मित्रामुळे.

त्यांच्या स्वाक्षऱ्यावर आज लिहिणार आहेच. परंतु त्यांच्या अभ्यासू स्वभावद्दलचा एक प्रसंग सागतो, प्रवीण दवणे यांचे गाणे लतादीदी गात होत्या. म्युझिक चालू होणार होते, लतादीदी दवणे यांचे गाणे घेऊन रेकॉर्डिंग रूममध्ये गुणगुणत होत्या. मी आणि प्रवीण काचेतून बघत होतो. इतक्यात लतादीदी यांनी प्रवीणला निरोप दिला जरा आत या. माझ्या मनात धडकी भरली काही चूक झाली का ? प्रवीण आत गेला, लतादीदी त्याच्याशी बोलल्या. प्रवीण बाहेर आला, मला उत्सुकता होती काय झाले. प्रवीणने जे संगितले त्यावर माझा विश्वास बसला नाही. पण ते खरे होते, वास्तविक पहाता प्रवीण दवणे यांचे काही चित्रपट त्याआधी झालेले होते. तसेच त्याआधी दीदींनी हजारो गाणी गायली होती. परंतु दीदी प्रवीणला विचारत होत्या, ह्या शब्दाचा उच्चार बरोबर आहे ना ? ह्याचा एकच अर्थ होतो जे काही आपण गाणार आहोत ते परिपूर्ण असावे आणि त्यासाठी त्या प्रयत्न करत असतात हे महत्वाचे.

स्वाक्षरी संग्राहक सतीश चाफेकर यांना स्वाक्षरी देताना

असे का होते… सतत तो आवाज कानावर असावा असे वाटते, त्या आवाजातले सौदर्य सतत वाढतच जाते, नवनवीन मिळताच जाते. अर्थात हे आपल्या मानसिक आंदोलनावर अवलंबून असते हे मात्र निश्चित. आमच्या पिढीने लता मंगेशकर यांना पाहिले, ऐकले ही किती भाग्याची गोष्ट आहे शब्दात सागूंन कळणार नाही. कारण ती एक अनुभूती आहे. खूप काही लिहिता येईल त्यांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या अद्भुत स्वाक्षरीबद्दल.

त्यांच्या स्वाक्षरीबद्दल एकच सांगतो लता मंगेशकर या अक्षरातच जबरदस्त जादू आहे, एक वेगळा आकर्षकपणा आहे जो संपूर्ण जगाला, तुमचे आमचे आयुष्य समृद्ध करतो. लतादीदींना पहिल्यांदा रेकॉर्डिंग रूममध्ये पाहिले ते उंबरठा चित्रपटावरून ‘सुबह’ चित्रपटाचे रेकॉर्डिंग होते तेव्हा त्यादिवशी ते जे गाणे गायल्या त्या गाण्याचे गीतकार पंडित नरेद्र शर्मा पण त्यावेळी स्टुडिओमध्ये होते. मी आणि प्रवीण दवणे याने ठाण्याला हृदयनाथ मंगेशकर यांना विनंती केली आम्हाला दिदींचे रेकॉर्डिंग बघता येईल का ? त्यांनी संगितले अमुक अमुक वेळेला बॉम्बे लॅबमध्ये या. आम्ही ठरल्यावेळी म्हणजे आधीच गेलो, दीदी आल्या त्याच्याबरोबर हृदयनाथजी होते, ठाण्याहून आलात का त्यांनी विचारले, आम्ही हो म्हणालो. लिफ्टमध्ये सगळे गेले, दीदीबरोबर कसे जाणार म्हणून मी बाहेर उभा, तितक्यात वर्षो न वर्षे जो आवाज ऐकत आलो होतो, त्या आवाजात गाणी ऐकत होतो तो आवाज कानावर पडला, त्या म्हणाले अहो आत लिफ्टमध्ये या ना. मग आम्ही दोघे लिफ्टमध्ये गेलो. दिवसभर त्यांच्या रिहर्सलचे गुणगुणणे कानावर पडत होते आणि मग संपूर्ण रेकॉर्डिंग. संगीतकार होते हृदयनाथ मंगेशकर यांचे. मग गिरीश कर्नाड, स्मिता पाटील ही मंडळीही आली. तो संपूर्ण भारलेला दिवस आजही विसरू शकत नाही. अशा असंख्य आठवणी येत आहेत, खरे तर मी काय किंवा माझ्यासारख्या अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष ऐकलं असेल, बघीतले असेल. त्या आठवणी चिरंतन रहाणार यात शंका नाही. काल प्रवीण बोलत असताना लता दीदींना अनेक वेळा बघितले, ऐकले सर्व काही आठवत होते आणि आजचा दिवस फक्त लतादीदींच्या गाण्याचा दिवस आहेच परंतु जेव्हा जेव्हा आनंदाचे कवडसे पडतही…

जेव्हा जेव्हा दुःखाचे मळभ येतील तेव्हा तेव्हा हाच लतादीदीचा आवाज साथ देणार हे निश्चित… ज्या निसर्गाने लतादीदींचा आवाज आम्हाला दिला… त्या निसर्गाचे शतशः आभार… त्याच निसर्गाने त्यांना देह रुपाने परत नेले… आज शब्द निशब्द झाले आहेत…

सतीश चाफेकर स्वाक्षरी संग्राहक

सर्व फोटो सतीश चाफेकर यांच्या सौजन्याने