April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

ऑनलाईनद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून होणार रेल्वेमार्गाचे लोकार्पण

ठाणे 

मध्य रेल्वेवरील लाखो प्रवाशांना दिलासा देणाऱ्या ठाणे ते दिवा दरम्यानच्या पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवार, १८ फेब्रुवारी रोजी ऑनलाईनद्वारे लोकार्पण केले जाणार आहे. तर, ठाण्यात होणाऱ्या कार्यक्रमात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत लोकलला हिरवा झेंडा दाखविला जाईल.

मध्य रेल्वेवरील ठाणे-दिवा पाचवा व सहावा मार्ग कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर ३६ अधिक फेर्‍यांबरोबरच प्रवास अधिक वेगवान होणार आहे. तसेच, भविष्यात वातानुकूलित लोकल सेवा सुरू होणार आहे. सध्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे प्रवाशांची होणारी रखडपट्टीही टळत आहे. या महत्वपूर्ण मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता ऑनलाईनद्वारे लोकार्पण केले जाणार आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातही लोकार्पण कार्यक्रम होणार असून, त्याला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. तर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, भाजपाचे खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची कार्यक्रमाला उपस्थिती राहतील.