April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

दुभाजकाला धडकलेल्या मोटारीतून तेल रस्त्यावर

ठाणे 

भरधाव वेगाने चाललेल्या वाहन चालक घनश्याम राजभर याचा गाडीवरील ताबा सुटून ही मोटार दुभाजकाला धडकल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगांव टोल नाक्याजवळ घडली. मोटारमधील तेल सांडल्याने वाहतुक कोंडी झाली होती. या अपघातात कोणतीही दुखापत झालेली नसून सांडलेल्या तेलावर माती पसरविल्यानंतर वाहतुक पूर्वपदावर आल्याची माहिती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

घनश्याम राजभर हा ठाण्याकडून कल्याणच्या दिशेने मोटारीने जात असताना, खारेगांव टोल नाक्याजवळ त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि तो रस्त्यालगत असलेल्या दुभाजकाला जाऊन धडकला. यावेळी, रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात तेल सांडले. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व वाहतूक पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, सांडलेल्या तेलामुळे काही प्रमाणात वाहतुक कोंडी झाल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्या तेलावरती माती पसरवून, मुंबई-नाशिक महामार्गावरील सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळा करून दिल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.