कल्याण
केंद्र शासन, राज्य शासन व स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कार्पोरेशन, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या दुर्गाडी किल्ल्याजवळील २.५ किमीचा नदी किनारा सुशोभिकरण व नौदल संग्रहालयाचे भूमिपूजन, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह व तिसगाव येथील डायलिसीस सेंटरचे उद्घाटन तसेच एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात आलेल्या दुर्गाडी खाडी पुलाचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज झाले.
यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील प्रमुख उपस्थित होते. नगर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते. गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार जगन्नाथ शिंदे, एमएमआरडीए चे आयुक्त व्ही श्रीनिवासन, महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नदीकिनारा सुशोभिकरण व नेव्हल गॅलरी विकसित करण्याचा प्रकल्प स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत हाती घेण्यात आला आहे, यामध्ये शिवकालीन काळातील आरमार प्रतिकृती संग्रहालय, भारतीय नौसेनेच्या बलाढ्य जहाजाची प्रतिकृती उभारली जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन आज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
तिसगाव येथे महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या १० बेडच्या डायलिसिस सेंटरचे उद्घाटनही ठाकरे यांच्या हस्ते झाले. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे माजी मंत्री सुधीर जोशी यांच्या निधनाबद्दल उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली.
माजी महापौर विनिता राणे, शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली, एस.के.डी.सी.एलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे यावेळी उपस्थित होते.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू