April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

केडीएमसी राष्ट्रीय स्तरावर प्रथम

कल्याण 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून केंद्र शासनाने राबविलेल्या ‘फ्रीडम टू वॉक’ या स्पर्धेत भारतातील काही स्मार्ट सिटीजने सहभाग घेतला होता. दिनांक १ जानेवारी २०२२ ते २६ जानेवारी २०२२ या दरम्यान झालेल्या स्पर्धेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या लीडरशीपखाली सहभागी झाली होती. काल सायंकाळी या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेअंती केडीएमसीने  राष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक पटकावला आहे.

याच स्पर्धेमध्ये व्यक्तिगत स्तरावर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत, नगर सचिव संजय जाधव आणि उप अभियंता अजित देसाई सहभागी झाले होते.

या स्पर्धेतील विविध कॅटेगरीमध्ये अधिकारी वर्गास चांगले यश मिळाले आहे. महिला कॅटेगरीमध्ये महापालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या आहेत. आयुक्त कॅटेगरीमध्ये संपूर्ण देशपातळीवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना चौथा क्रमांक प्राप्त झाला असून व्यक्तिगत कॅटेगरीमध्ये पल्लवी भागवत सहाव्या क्रमांकावर तर महापालिका सचिव संजय जाधव आठव्या क्रमांकावर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार अकराव्या क्रमांकावर आणि महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे चौदाव्या क्रमांकावर तर महापालिकेचे उप अभियंता अजित देसाई नवव्या क्रमांकावर आले आहेत.

या स्पर्धेसाठी महापालिकेची टीम शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांवर धावण्याचा सराव करत असताना, नागरिकांनी देखील त्यांचे समवेत धावत उस्फूर्त प्रतिसाद दिला. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेस देशपातळीवर प्राप्त झालेल्या कोविड इनोव्हेशन पुरस्कार, ऊर्जा संवर्धन पुरस्कार, या पुरस्कारांच्या दैदीप्यमान यशानंतर आज फिटनेसचे महत्व जाणवुन देणाऱ्या फ्रीडम टू वॉक या स्पर्धेत संपूर्ण देशात प्रथम क्रमांक मिळविल्यामुळे महापालिकेची मान अभिमानाने अधिक उंचावली गेली आहे.