देशाच्या न्यायपालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना…
विशेष प्रतिनिधी
गुजरातसह संपूर्ण देश हादरविलेल्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील ३८ दोषी आरोपींना शुक्रवारी विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. या खटल्यातील अन्य ११ दोषींनाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
२६ जुलै, २००८ रोजी राज्यासह देश हादरविलेल्या या साखळी बॉम्बस्फोटात तब्बल ५६ निरपराध नागरिकांचा बळी गेला होता. या खटल्यातील २८ दोषींची न्यायालयाने आधीच सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली होती. सुमारे १४ वर्षे चाललेल्या खटल्याच्या सुनावणीनंतर या अमानुष नरसंहाराला कारणीभूत ठरलेल्या नराधमांचा अखेर न्यायदेवतेने न्याय केलाच. अहमदाबादच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश न्या. अंबालाल पटेल यांनी आपल्या ७ हजारांहून अधिक पानी निकालपत्रात या नराधमांच्या दोषसिद्धतेवर शिक्कामोर्तब करीत त्यांना शिक्षा सुनावली. दोषींचे कृत्य दुर्मिळात दुर्मीळ असल्याचा अभिप्राय न्या. पटेल यांनी नोंदवला. एकाच वेळी ३८ जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाण्याची देशाच्या न्यायपालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना. याआधी जानेवारी १९९८ मध्ये तामिळनाडूमधील टाडा न्यायालयाने १९९१ मधील देशाचे तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या खटल्यातील २६ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती.
या बॉम्बस्फोटाच्या घटनाक्रमावर एक कटाक्ष..
२६ जुलै, २००८ हा तो दिवस…
अहमदाबादकरांच्या अंगावर शहारे आणणारा. या दिवशी अहमदाबाद महानगरपालिकेच्या हद्दीतील तब्बल २१ ठिकाणी इंडियन मुजाहिद्दीन (आयएम) आणि स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या धर्मांध दहशतवादी संघटनेशी संबंधित मृत्यूच्या सौदागरांनी अवघ्या ७० मिनिटांच्या कालावधीत ही बॉम्बस्फोट मालिका घडून आणत ५६ निष्पाप नागरिकांचा बळी घेतला तर २०० हून अधिक जणांना जायबंदी केले. या स्फोटाने गुजरातसह संपूर्ण देश हादरला होता. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी अहमदाबादमध्ये २० तर सुरतमध्ये १५ गुन्हे दाखल केले होते. संबंधित गुन्ह्यातील सर्व आरोपी एकाच कटाचा भाग असल्याने सर्व गुन्हे एकत्र करून एकत्रित खटला भरवण्यात आला होता.

२८ जुलै रोजी पोलिसांचे पथक स्थापन
यानंतर २८ जुलै रोजी गुजरात पोलिसांचे एक विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने अवघ्या १९ दिवसांत ३० दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले होते. उर्वरित दहशतवाद्यांना यानंतर वेळोवेळी जेरबंद करण्यात आले. अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटांपूर्वी इंडियन मुजाहिदीनच्या याच दहशतवाद्यांनी जयपूर आणि वाराणसीमध्ये देखील बॉम्बस्फोट घडवून आणला होता.
पहिला बॉम्बस्फोट मनिनगरमध्ये
पहिला बॉम्बस्फोट सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी मणिनगरमध्ये झाला. नंतर अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल, ट्रॉमा सेंटर, खडिया, रायपूर, सारंगपूर, हाटकेश्वर सर्कल, बापूनगर, ठक्कर बापा नगर, जवाहर चौक, गोविंदवाडी, इसानपूर, नरोल, सरखेज आदी ठिकाणी एका मागोमाग एक बॉम्बस्फोट झाले. इंडियन मुजाहिदीनने २००२ मधील गोध्राकांडाचा बदला घेण्यासाठी हे स्फोट घडवून आणले होते. दहशतवाद्यांनी एकूण २३ बॉम्ब पेरले होते. पण कलोल आणि नरोडामध्ये लावलेले बॉम्ब निकामी झाले.
अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ जुलैला सुरतमध्ये देखील बॉम्बस्फोट घडवण्याचा कट त्यांनी आखला होता. पण टायमरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांचा मनसुबा फसला. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ७८ जणांपैकी एक आरोपी माफीचा साक्षीदार बनला होता. उर्वरित ७७ जणांपैकी ४९ जणांना गुजरात न्यायालयाने दोषी ठरवले. त्यापैकी ३८ नराधमांना मरेपर्यंती फाशीची तर उर्वरित ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी तब्बल ११६३ साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवण्यात आले होते. पोलीस आणि तपास यंत्रणांनी सहा हजारांहू पुरावे न्यायालयात सादर केले होते.
तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी-कर्मचाऱ्यांनी मानवी मनाचा थरकाप उडविणाऱ्या या संवेदनशील घटनेचा खोलात जाऊन तपास करून त्यांना दोषी ठरविले जाऊ शकेल असे सबळ साक्षी-पुरावे न्यायालयात सादर केले. सरकारी वकिलांनीही जोरकसपणे युक्तीवाद करून त्यांच्या दोषसिद्धीवर शिक्कामोर्तब होईल अशी बाजू न्यायालयात मांडली. या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम झाला आणि रक्तरंजित खेळ करून ५६ जणांचा जीव घेतलेल्या या नराधमांनाही त्याच मार्गाने पाठविण्यासाठी नियतीनेही आपला न्याय केला. नियतीचा न्याय निष्ठूर असतो असे म्हणतात. या नराधमांना मिळालेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या निमित्ताने तो झाला आहेच. आता प्रतिक्षा आहे ती त्यांच्या गळ्यात फाशीचा दोर कधी अडकवला जातो याची. तेव्हाच अहमदाबादकर-गुजरातवासीयांसह देशभरातील नागरिकांच्या हृदयावर आघात केलेली ही भळभळती जखम पुसली जाऊ शकेल.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू