वाहतूक पोलिसांकडून उद्यापासून ई चलानद्वारे दंड आकारणी
कल्याण
सिग्नल मोडणाऱ्या वाहन चालकांवर उद्या (मंगळवार) २२ फेब्रुवारीपासून ई चलानद्वारे दंड आकारणी केली जाणार आहे. कल्याण शहर वाहतूक पोलीस उद्यापासून कल्याणातील पाच प्रमुख चौकांत ही ई चलान यंत्रणा कार्यरत करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत साधारणपणे वर्षभरापासून कल्याणात प्रमूख चौकांमध्ये ट्राफिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या सिग्नलवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मात्र, कोवीडमूळे सिग्नल मोडून जाणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जात नव्हती. त्यानंतरही सिग्नलनुसार वाहने चालवणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय अशी असली तरी वाहतुक वाहतुक पोलिसांची कारवाई होत नसल्याचे लक्षात आल्याने सिग्नल मोडणाऱ्या वाहनांची संख्याही वाढत चालली होती. मात्र, त्याला आळा घालण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे.
कल्याणातील आधारवाडी चौक, खडकपाडा चौक, संदीप हॉटेल, प्रेम ऑटो आणि कल्याण पूर्वेतील आनंद दिघे चौकात सिग्नल मोडणाऱ्या किंवा सिग्नल लाईन क्रॉस करणाऱ्या वाहन चालकांवर ई चलानद्वारे दंड आकारणी केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली. तसेच पहिल्यांदा पाचशे रुपये तर त्यानंतर दुसऱ्यांदा सिग्नल मोडल्यास किंवा लाईन क्रॉस केल्यास एक हजार पाचशे रुपये दंड आकारणी केली जाणार असल्याचेही तरडे यांनी सांगितले. तर हा दंड भरावा लागू नये म्हणून वाहन चालकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहनही कल्याण शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू