विधानसभा उपाध्यक्षांनी घेतली कोकण वसाहतीतील रहिवाशांची दखल
कल्याण
भ्रष्टाचारामुळे कल्याणमधील कोकण गृहनिर्माण वसाहतीचा पुनर्विकास प्रकल्प रखडला असल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांनी केला असून कित्येक वर्षे उलटून देखील सदनिका न मिळाल्याने येथील रहिवासी हवालदिल झाले आहेत. या प्रकरणाची दखल विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घेतली असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आणि कोकण वसाहतीतील रहिवाशांची नुकतीच बैठक घेत याप्रकरणी तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील बिर्ला महाविद्यालय येथील कोकण गृहनिर्माण मंडळ अंतर्गत एमआयजी, एलआयजी, एचआयजीकडे रखडलेल्या घराच्या संदर्भात येथील रहिवाशांनी किरण शिखरे यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारी केल्या होत्या. या समस्यांच्या सोडवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधान भवन येथे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. याबाबत, २७ जानेवारी रोजी पहिली तर २४ फेब्रुवारी रोजी दुसरी बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीला कोकण वसाहत येथील बरेच सदस्य हजर होते. कोकण गृहनिर्माण मंडळाचे अधिकारी, केडीएमसी अधिकारी, विधानभवनातील अधिकारी यांच्या उपस्थितीत येथील रहिवाश्यांचे सर्व प्रश्न समजून त्यावर योग्य दिशा महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडून देण्यात आली. यावेळी, शिखरे यांच्यासमवेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे विशेष निमंत्रित सदस्य नगरसेवक संजय पाटील, नाशिक ग्रामीण विद्यार्थी अध्यक्ष नंदन भास्करे, नितीन पाटील, सोमनाथ सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
झिरवाळ यांनी कोकण गृहनिर्माण मंडळाचे अधिकारी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी, विधानभवनातील अधिकारी यांना या बैठकीत याप्रकरणी तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू