कोणताही करवाढ नसलेला केडीएमसीचा अर्थसंकल्प सादर
१७७३.५६ कोटी जमा व १७७२.५० कोटी खर्चाचे आणि १०६ लक्ष शिलकीच्या अर्थसंकल्पाला आयुक्तांची मंजुरी
कल्याण
कोणतीही कर दर वाढ नसलेले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रु. १७७३.५६ कोटी जमा व रक्कम रु. १७७२.५० कोटी खर्चाचे आणि रक्कम रु. १०६ लक्ष शिलकीचे सन २०२२-२३ च्या मुळ अंदाजपत्रकाचे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी सादरीकरण करीत मंजूरी दिली. यावर्षीच्या अंदाजपत्रकात नागरिकांच्या आरोग्य सुविधांवर, क्रिडा व शहर सौंदर्यीकरणावर भर देण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रक्कम रु. १५५०.४२ कोटी जमा आणि रक्कम रु. १३२३.९५ कोटी खर्चाचे, सन २०२१-२०२२ चे सुधारीत अंदाज तसेच रक्कम रु. १७७३.५६ कोटी जमा व रक्कम रु. १७७२.५० कोटी खर्चाचे आणि रक्कम रु. १०६ लक्ष शिलकीचे सन २०२२-२३ चे मुळ अंदाजपत्रक केडीएमसी आयुक्त तथा प्रशासक डॉ. सूर्यवंशी यांनी आज जाहीर करुन मंजूर केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता सपना कोळी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, परिवहन व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत व्यासपीठावर आणि इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

करापोटी रक्कम रु ३७५.०६ कोटी उत्पन्न अपेक्षित
या वर्षीच्या अंदाज पत्रकात मालमत्ता करापोटी रक्कम रु ३७५.०६ कोटी उत्पन्न अपेक्षित धरले असून जीएसटी अनुदान व मुद्रांक शुल्कापोटी ३६५.६४ कोटी रुपये अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे. पाणीपट्टीव्दारे ७०.२५ कोटी उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले असून विनावापर असलेल्या महापालिकेच्या मालमत्ता भाडयाने देणे, पार्किंग पॉलिसी याव्दारे रु ९०.७७ कोटी उत्पन्न अपेक्षित करण्यात आले आहे. भांडवली उत्पन्नामध्ये महापालिकेचे स्वत:चे भांडवली उत्पन्न आणि शासनाकडून भांडवली कामासाठी प्राप्त होणारे अनुदान असे एकुण रक्कम ३८२.२७ कोटी एवढा निधी अपेक्षित धरण्यात आला आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार पाणी पुरवठा व व्यवस्थापनात सुधारणा व प्रभावी घकनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ हवा कार्यक्रम या अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षांत रु. ६३ कोटीचे अनुदान प्राप्त होणे अपेक्षित आहे.
अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये रु. ४७ कोटीची तरतूद
खर्च बाबी अंतर्गत महसुली स्वरुपाच्या कामासाठी अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये रु. ४७ कोटीची तरतूद करण्यात आली असून भांडवली खर्चाकरिता रु. ३८ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. उदयान, मैदाने, क्रिडांगणे व तलाव सुशोभित करण्याअंतर्गत रक्कम रु. १०.१० कोटी महसूली खर्चाअंतर्गत व भांडवली खर्चअंतर्गत रु. १०.७० कोटी तरतूद करण्यात आली आहे. उड्डानपूलासाठी रु. २० कोटीची तरतूद भांडवली खर्चाअंतर्गत करण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था केंद्रस्थानी
कोरोना महामारीचे संकट अद्यापि पुर्णपणे संपले नसल्याने पुढील वर्षीदेखील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था केंद्रस्थानी राहणार असल्याने या करिता महसूल खर्चाअंतर्गत रु. ४३.६५ कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. सार्वजनिक स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत महसूली खर्चाकरिता रक्कम रु. ७७.२१ कोटीची व भांडवली खर्चाकरिता रु. १५.२६ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
स्वच्छतेचा संदेश देणारी भित्तीचित्रे
केडीएमसी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतील कायापालट अभियांनाअतर्गंत शहरातील सर्व प्रमुख रस्ते स्वच्छ व सुंदर करण्यात येणार असून रस्त्यांच्या मधील दुभाजक रंगवून त्यामध्ये झाडे लावून त्याची निगा राखण्यात येणार आहे. इमारतीच्या दर्शनी भागाच्या वाडे, भिंतीवर स्वच्छतेचा संदेश देणारी भित्तीचित्रे महापालिका व नागरिकांच्या सहभागातून रंगविण्यात येणार आहेत.
नागरिकांच्या स्वास्थावर आणि क्रिडागुणांचा विकास साधण्यावर भर
आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी यावर्षीच्या अंदाजपत्रकात नागरिकांच्या शारिरीक स्वास्थ्यावर आणि त्यांच्या क्रिडागुणांचा विकास साधण्यावर भर दिला असून, आता सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडासंकुलाचा कायापालट करण्यात येणार आहे. सर्व क्रिडा प्रकारांकरिता खंबाळपाडा येथे अत्याधुनिक क्रिडासंकुल उभारण्यात येणार असून त्याध्ये बॅटमिंटन, टेबलटेनिस, कॅरम व बुध्दीबळ इ. विविध प्रकारच्या खेळांची सुविधा असणार आहे. त्याप्रमाणे महापालिकेच्या आरक्षित जागेत एक इनडोअर कबड्डी स्टेडियम व बारवी येथे एक फुटबॉल स्टेडियम तयार करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रात कबड्डी करिता ५० कबड्डी स्टेडियम ०३ फुटबॉल, ०५ क्रिकेट व २५ व्हॉलीबॉल आणि १० खो-खो मैदाने विकसित करण्यात येणार आहेत. त्याप्रमाणे यापुढे खेळांच्या मैदानावर कोणतेही राजकीय समारंभ, लग्न समारंभ आयोजित न करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे.
नवीन १० उद्यान विकसित करण्याचा मानस
महापालिका परिसरातील लोकसंख्या विचारात घेता ०६ नविन स्मशानभुमी तयार करण्याचे प्रस्तावित आहे. महापालिका क्षेत्रात नविन १० उदयान विकसित करण्याचा मानस असून त्यात बायो-डायर्व्हसिटी पार्क, दिव्यांगासाठी उदयान, ट्रॅफिक पार्क इत्यादीचा अंतर्भाव आहे. महापालिका क्षेत्रातील रस्ते कॉक्रीटीकरण, डांबरीकरण करण्याकरिता एमएमआरडीए मार्फत ३१ रस्त्यासाठी रु ३६०.६४ कोटीच्या कामांना प्रशासकिय मंजूरी मिळाली असून यापैकी रु २८.५९ कोटीचे ०७ रस्ते महापालिकेमार्फत विकसित करण्यात येणार आहेत. विदयार्थ्यांना भूगोल मंडळाचा आणि अवकाशाचा अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका क्षेत्रात पीपीपी तत्वावर नेहरु तारांगणाच्या धर्तीवर तारांगण तयार करण्यात येणार आहे.
नविन मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार
महापालिकेच्या नागरिकांसाठी चांगल्या आरोग्य सुविधा उभारण्यावर देखील महापालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी भर दिला असून, शक्तीधाम गणेशवाडी येथे १०० बेड्चे प्रसुतीगृह व सामान्य रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे तसेच, डोंबिवली येथे पीपीपी तत्वावर ५० बेड्चे सुतिकागृह उभारण्यात येणार आहे. कल्याण येथे लिलावती किंवा बॉम्बे हॉस्पिटलच्या धर्तीवर १५० बेड्सचे नविन मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यामुळे, नागरिकांना गंभीर आजाराकरिता मुंबई येथे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. त्याप्रमाणे, टिटवाळा परिसरातील रुग्णांसाठी रुक्मिणी प्लाझा येथे ५० बेड्सचे सामान्य रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण व शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली येथे प्रत्येकी १० बेड्चे आय.सी.यु तयार करण्यात आले असून ते लवकरच सुरु करण्यात येतील. त्याचप्रमाणे ०१ महिना ते १० वर्षं या वयातील मुलांसाठी शास्त्रीनगर व रुक्मिणीबाई रुग्णालय येथे प्रत्येकी १५ बेड्चे पीआयसीयु सुरु करण्यात येणार असून प्रसुतीनंतर नवजात बालकांमध्ये उद्भवणा-या गंभीर समस्यावर उपचार करण्यासाठी शास्त्रीनगर रुग्णालय व वंसत व्हॅली प्रसुतीगृह येथे प्रत्येकी १० बेड्चे एनआयसीयु सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.
घराजवळ होणार आरोग्य सुविधा उपलब्ध
त्याप्रमाणे शास्त्रीनगर व रुक्मिणीबाई रुग्णालय येथे थॅलेसेमिया केंद्र देखिल सुरु करण्यात येणार आहे. महापालिकाक्षेत्रात एकूण १८ नागरी आरोग्य केंद्र कार्यरत असून या व्यातिरिक्त नागरिकाना घराजवळ आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याकरिता ०७ नविन नागरी आरोग्य केद्रं सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. किडणी आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी अल्प दरात डायलिसीस सुविधा उपलब्ध होण्याकरिता १० बेड्स क्षमतेची ०३ डायलिसीस केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत.
दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून सीबीएसई बोर्डाच्या शाळा
डोंबिवली येथील १०० मे. टन ओल्या कच-यापासून खत निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या कामाची निविदा अंतिम करण्यात येवून डिसेंबर २०२२ अखेर प्रकल्प सुरु करण्याचा मानस आहेत. महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य पालकांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून सीबीएसई बोर्डाच्या ०३ शाळा येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात येणार आहेत, त्याप्रमाणे महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणा-या विदर्यांथ्यांना इ. १० वी पर्यंत सर्व सोईसुविधायुक्त शिक्षण घेता यावे याकरिता महापालिकेमार्फत माध्यमिक शाळा सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.
महापालिका क्षेत्रातील नागरीकांना उत्तम दर्जाची परिवहन व्यवस्था उपलब्ध करुन देण्याकरीता या अर्थसंकल्पामध्ये भांडवली खर्चा अंतर्गत रक्कम रु ५.०० कोटी व महसूली खर्चासाठी रक्कम रु ३५.०० कोटीची तरतूद प्रस्तावित केली आहे.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू