आधारवाडी चौकात भेट देऊन नरेंद्र पवार यांनी केली सिग्नल व रस्त्याची पाहणी
कल्याण
पश्चिममधील आधारवाडी चौक येथील नवीन कार्यरत झालेल्या सिग्नल यंत्रणेमध्ये त्रुटी असून त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. चौकातील सिग्नलच्या खांबापासून सुरक्षित असलेली स्टॉप लाईन नागरिकांना दिसत नाही, त्या स्टॉपलाईनवर ऑइलपेंटचे पट्टे ओढणे गरजेचे, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग अर्धवट आहे अशा अनेक समस्या असल्याने त्या तातडीने दुरुस्त करण्याची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्याकडे केली.
कल्याणमध्ये सिग्नल व्यवस्था कार्यान्वित केली असली तरीही सकाळी शहरात प्रवेश करणाऱ्या व सायंकाळी बाहेर जाणाऱ्या वाहतुकीसाठी हिरवा सिग्नल जास्त वेळेसाठी असावा, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी केवळ १५ सेकंद वेळ आहे तो वाढवण्याची आवश्यकता आहे असल्याचेही नरेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले. सुज्ञ नागरिक अशोक शेलार आणि सुधीर गायकर यांनी या संदर्भात पवार यांच्याकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने हा पाहणी दौरा आयोजित केला होता.
नागरिकांना वाहतूक करताना सोयीस्कर व्हावे यासाठी तातडीने या त्रुटी दुरुस्त करण्याची गरज आहे. या त्रुटी सोडविल्या तर अपघात कमी होणार असून नागरिकाला वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागणार नसल्याचे पवार म्हणाले. यावेळी अशोक शेलार, गोपाल शेलार , विवेक शेलार, सुधीर गायकर, तानाजी गायकर, अरविंद शेलार आदी नागरिक उपस्थित होते.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू