डोंबिवली
रेल चाईल्ड संस्थेच्या महात्मा गांधी विद्यामंदिर शाळेच्या १९७५ ते २०२१ या ४७ वर्षांतील माजी विद्यार्थ्यांच्या महामेळाव्याचे भव्य आयोजन अरुणोदय लॉन्सच्या पटांगणावर रविवारी करण्यात आले होते. यू-ट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सदर सोहळा प्रसारित करण्यात आला होता. या भव्य माहेर मेळाव्याला सुमारे ७५० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे तर हजारो विद्यार्थ्यांनी यू-ट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हजेरी लावून आनंद लुटला.
कोरोना प्रादुर्भावामुळे महामेळावा ढकलावा लागला पुढे
माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा आयोजनाची तयारी शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून तत्कालिन शाळा समिती अध्यक्ष उल्हास झोपे यांनी रेल चाईल्ड संस्थेच्या माध्यमातून केली होती. परंतु, कोरोना प्रादुर्भावामुळे महामेळावा पुढे ढकलावा लागला. चालू शैक्षणिक वर्षात कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे रेल चाईल्ड संस्थेच्या मार्गदर्शनानुसार शाळा समिती अध्यक्ष गिरीश जोशी यांनी कोणत्याही परिस्थितीत मेळावा घेण्याचे निश्चित केले. नोव्हेंबर २०२१ पासून माजी विद्यार्थ्यांचे संघटन करण्यास सुरवात झाली. वयाच्या ५० ते ७० वयोगटातील ज्येष्ठ माजी विद्यार्थांचा उत्साहतर अवर्णनीय होता. व्हॉटस्ॲपवर रेल चाईल्ड माजी विद्यार्थी सुमारे ७ ते ८ ग्रुप तयार झाले. प्रत्येक बॅचचे स्वतंत्र ग्रुप अधिक सक्रीय झाले. माजी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन बैठकांची लगबग सुरु झाली. ३० जानेवारी ही तारीख निश्चित झाली. मात्र, कोरोना व ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भामुळे माजी विद्यार्थी महामेळाव्याला येण्यासाठी धजावत नव्हते. शासनाच्या अनेक निर्बंधामुळे महामेळाव्याची तारीख पुढे करुन ६ मार्च ही निश्चित केली.
आता मात्र काहीही होवो माजी विद्यार्थी महामेळावा करायचाच या निश्चयाने रेल चाईल्ड संस्थेच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी जय्यत तयारीला लागले. पुन्हा समाज माध्यमांवरुन संदेश गेले. गुगल फॉर्मच्या माध्यमातून निश्चिती करणे सुरु झाले. माजी विद्यार्थ्यांचा महामेळाव्यात येण्याचा उत्साह वाढावा, यासाठी ज्येष्ठ माजी मुख्याध्यापिका उषा इंगळे, अलका कांबळे, प्राची पेणकर माजी शिक्षिका यामिनी भुस्कूटे, चित्रा पाटील, सरिता काकिर्डे तसेच माजी उपमुख्याध्यापक पुंजाजी पाचपांडे, प्रेमराज काळे, प्रकाश परदेशी व माजी शिक्षक मधुकर पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांना आवाहन करणारे व्हिडिओ तयार करुन पाठवले. यातून माजी विद्यार्थ्यांचा उत्साह दुणावला.
६ मार्च रविवारचा दिवस उजाडला..!
पहाटे ५ वाजल्यापासून शाळेत व मेळाव्याच्या ठिकाणी रांगोळ्या काढल्या. रेल चाईल्ड संस्था पदाधिकारी, संस्थेचे माजी सदस्य आणि शाळेतील कार्यरत शिक्षक, विद्यार्थी हे माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर व माजी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले. सकाळी ८ वाजता महात्मा गांधी विद्यामंदिर ते अरुणोदय लॉन्स या पथमार्गावर ढोल, ताशा व हलगीच्या तालावर नऊवारी साड्यांमध्ये नटलेल्या विद्यार्थिनींनी लेझीमच्या माध्यमातून माजी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तरांची सन्मानयात्रा काढली. माजी विद्यार्थ्यांचे गटागटाने व बालपणाच्या सुखद आठवणींच्या चर्चा रंगत आगमन झाले. उपस्थित सर्वजण सकाळच्या चहा व नाश्त्याचा आस्वाद घेत होते. ज्येष्ठ माजी विद्यार्थी व चित्रकार चंद्रकांत कांबळे यांच्या संकल्पनेतून साकारलेले चित्र व सुविचार सर्व माजी विद्यार्थ्याना खुणावत होते ते असे – शाळेचे दप्तराला उद्देशून – हे ओझं माझ्या आयुष्याचे सार्थक करुन गेलं..!
अन झाली महामेळाव्याची सुरुवात
सकाळी १० वाजता महामेळाव्याला सुरवात झाली. आणि शाळेची घंटा वाजली… या कुन्देन्दु तुषार हार धवला… गुरुर्बम्हा गुरुर्विष्णू… जन-गण-मन… भारत माझा देश आहे… हे सर्व शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारं वातावरण माजी विद्यार्थ्यांना भावूक करणारे होते. महामेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास आयुक्त महेंद्र वारभुवन आणि विष्णूनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोहन खंदारे तसेच रेल चाईल्ड संस्था अध्यक्ष दत्तात्रय गोडबोले, उपाध्यक्ष नितीन दिघे, कार्यवाह भगवान सुरवाडे, सहकार्यवाह दिलीप झरकर, कोषाध्यक्ष उल्हास झोपे हे मान्यवर उपस्थित होते. गिरीश जोशी यांनी प्रास्ताविक सादर केले. माजी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर वृंदांचा भव्य सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. माजी उपमुख्याध्यापक पुंजाजी पाचपांडे सरांनी अनुभवांच्या शिदोरीतील किस्से सांगत माजी विद्यार्थ्यांना जुन्या आठवणींमध्ये रममाण केले. माजी मुख्याध्यापक प्रकाश परदेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी महेंद्र वारभुवन यांनी माजी विद्यार्थी व शैक्षणिक संस्था हे नाते दृढ होणे आवश्यक आहे हा आशावाद व्यक्त केला. तसेच पोलिस निरीक्षक मोहन खंदारे यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभवांची आठवण सांगून शाळेला कोणतेही सहकार्य लागल्यास आम्ही तयार आहोत हा विश्वास प्रगट केला. संस्था कार्यवाह भगवान सुरवाडे व अध्यक्ष दत्तात्रय गोडबोले यांनी संस्था सदैव माजी विद्यार्थ्यांच्या गटानुसार मेळाव्यासाठी शाळा उपलब्ध करुन देण्यासाठी तयार आहे. तसेच माजी विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा फायदा शाळेतील शिक्षणाचा लाभ घेत असलेल्या विद्यार्थांना देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. आपापल्या कार्य क्षेत्रात उज्जल यश संपादन केलेल्या हिन्दरत्न पुरस्कार्थी भूषण चौधरी, सुजाता घाडी, जान्हवी रोठे, माजी सैनिक अतुल देशमुख, अनिल कुलकर्णी यांनी अत्यंत प्रभावीपणे मनोगते व्यक्त केली.
ज्येष्ठ माजी विद्यार्थी व डोंबिवलीमधील गोरगरीब गरजू़साठी आपलेपणाने उभे राहणारे प्रल्हाद म्हात्रे यांची उपस्थिती विशेष जाणवत होती. ज्येष्ठ माजी विद्यार्थी व शिक्षणतज्ज्ञ विश्वास भोईर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गप्पा व चर्चा मध्ये मशगुल झालेले माजी विद्यार्थी महामेळाव्याच्या सांगता सोहळ्यासाठी आतुर झाले. शाळेतील प्राथमिक शिक्षिका प्रज्ञा कुलकर्णी व माध्यमिक शिक्षिका मंजुषा तावडे यांच्या लेखणीतून साकारलेले पंचमहाभूते या विषयातील ५ तत्वावर आधारित, ५ आकर्षक नृत्ये शाळेतील इयत्ता ७ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी सादर करुन माजी विद्यार्थ्यांना म़त्रमुग्ध केले. शेवटी प्राथमिक शाळा समिती अध्यक्ष मुरलीधर चौधरी यांनी आभार व्यक्त केले. संपूर्ण मेळाव्याचे सूत्रसंचलन मंजुषा तावडे, प्रिया जोशी, प्रज्ञा कुलकर्णी व राजेंद्र पाटील यांनी केले.
सरते शेवटी सस्नेह भोजन, गप्पा, चर्चा व फोटोशूटींग मध्ये मशगुल होत या सुंदर अशा सोहळ्याची सांगता झाली. शाळेतील प्राथमिक शिक्षिका प्रज्ञा कुलकर्णी व माध्यमिक शिक्षिका मंजुषा तावडे यांच्या लेखणीतून साकारलेले पंचमहाभूते या विषयातील ५ तत्वावर आधारित, ५ आकर्षक नृत्ये शाळेतील इयत्ता ७ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी सादर करुन माजी विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. महामेळावा यशस्वी करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिज्ञक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद तसेच इयत्ता ८ वी व ९ वी विद्यार्थी स्वयंसेवकांनी, मुख्याध्यापक अंकुर आहेर सरांच्या खांद्याला खांदा लावून खूप मेहनत घेतली.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू