April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

मरणानंतरही मृताच्या देहाची होतेय विटंबना

मरणानंतरही मृताच्या देहाची होतेय विटंबना

कल्याण : एकही स्मशानभूमी नसलेली ग्रामपंचायत

खडवलीमध्ये मरणानंतरही यातना

स्मशानभूमी नसल्याने रहिवाशांची होतेय परवड

कल्याण

खडवली ग्रुप ग्रामपंचायत असून या क्षेत्रातील लोकवस्ती ही पाच ते सहा हजारांच्या आसपास आहे. ही ग्रामपंचायत मुरबाड विधानसभा मतदारसंघात येते. तसेच, या ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाशांनी याच गणातून ठाणे जिल्हा परिषदेला अध्यक्ष व कल्याण पंचायत समितीला सभापती दिला. या क्षेत्रात प्राथमिक पायाभूत सुविधांचा बोजवारा तर आहेच. तेथील रहिवाशांना त्यांच्या हयातीत सुविधा अभावी होणारा त्रास सहन करावा लागतोच, परंतु, त्यांच्या मरणानंतरही मृताच्या देहाची होणारी विटंबना ही दुर्दैवीच आहे.

कल्याण तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात खडवली, वावेघर गावात स्मशानभूमी नसल्याने येथील रहिवाशांना मरणानंतरही यातना भोगाव्या लागत आहेत. स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या जागेवर भूमाफियांनी केलेले अतिक्रमण हटवून हा भूखंड ताब्यात घ्यावा. याठिकाणी स्मशानभूमी बांधावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा आणि एखाद्याचे निधन झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर मृतावर अंत्यसंस्कार करण्याचा इशारा खडवलीमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

या क्षेत्रात स्वातंत्र्य काळापासून ते आजतागायत एकही स्मशानभूमी बांधली गेली नाही. मागील काळात काही वर्षांपूर्वी काही जागरूक नागरिकांच्या प्रयत्नांनी महसूल विभागाकडून सर्वे नंबर ३१ व सर्व्हे नंबर ३४ यामधील भूखंड स्मशानभूमीकरीता आरक्षित करून तशी नोंद सातबारा सदरी घेतली. परंतु, सत्ताधारी व स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांनी स्मशानभूमीच्या बांधकाम निर्मितीकडे कानडोळा केल्याने भूमाफियांनी याठिकाणी चाळी बांधल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

याबाबत, स्मशानभूमी बांधकाम निर्मितीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील पदरी उपेक्षाच आली आहे. स्मशानभूमी अभावी येथील रहिवाशांना मृतदेहाचे अंत्यसंस्कार करताना रात्री-अपरात्री जंगलाची काटेरी वाट तुडवत नदीपात्राकडे जावे लागते. कधी तर मुसळधार पावसात मृताचे अर्धवट जळालेले शरीर वाहून जाते तर कधी भटक्या कुत्र्यांच्या भक्षास बळी पडते.

नुकतेच रात्रीच्या सुमारास मृत शरीराची अंतयात्रा नेतांना येथील रेल्वे फाटक बंद झाल्याने खांद्यावरचे प्रेत हातावर घेऊन रेल्वेगाडीच्या भीतीने कितीतरी वेळ ताटकळत राहावे लागले. हा सर्व दुर्दैवी प्रकार कधी थांबेल? आणि मेल्यानंतरही होणारी विटंबना केव्हा थांबेल?  इतक्या वर्षांनंतर आजही स्मशानभूमी शासनाकडून बांधले जाईल का?  ग्रामपंचायत स्मशानभूमी बांधण्याकडे गांभीर्याने पाहिल का? असा संतप्त सवाल रहिवाशांकडून केला जात आहे.

एका महिन्याच्या आत जर आरक्षित भूखंड ताब्यात घेऊन दोन ते तीन स्मशानभूमी बांधली गेली नाही तर येथील संतप्त रहिवाशांनी आमरण उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. याची शासनाने दखल घ्यावी व पुन्हा प्रेताच्या अंत्यसंस्काराची वेळ आली तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्यविधी केला जाईल असा इशारा अॅड. सचिन शेळके, निसर्ग संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल कशिवले, महिला कार्यकर्त्या सुनीता शेळके, आरपीआय अध्यक्ष अशोक रातांबे यांनी दिला आहे.