न्यायालयाने सुनावली दुहेरी जन्मठेप
आणि, १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
कल्याण
पश्चिमेतील मुरबाड रस्त्यावरील रामदासवाडी भागात राहणाऱ्या तीन भावांवर रात्रीच्या वेळेत धारदार शस्त्राने हल्ला करून दोन भावांची हत्या करणाऱ्या आणि तिसऱ्या भावाला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी दुहेरी जन्मठेप आणि दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
हल्लेखोरांमधील मनोज शंकर खांडगे (३७, रा. रामदासवाडी) या आरोपीचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. आरोपी संजय नामदेव पाटील (४८, रा. रामदासवाडी) याला न्यायालयाने दोन भावांच्या खून प्रकरणी दुहेरी जन्मठेप आणि एक भावाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अश्विनी भामरे-पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पोलीस आणि न्यायालय समन्वयक म्हणून दीपक पिंगट, शशिकांत गांगुर्डे यांनी काम पाहिले. महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने, गुन्हे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी न्यायालयीन साक्षी पुराव्यासाठी या प्रकरणातील सबळ दस्तऐवज न्यायालयात सादर केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमेतील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ३ डिसेंबर २०१० रोजी रात्रौ पावणे बाराच्या सुमारास पोलीस ठाण्यातील फिर्यादी रामदास यशवंत देवकर, (वय ४२ वर्षे, राहणार रामदासवाडी) त्यांचे भाऊ अशोक यशवंत देवकर, (वय ४० वर्षे, रामदासवाडी) कृष्णा यशवंत देवकर,( वय ३२ वर्षे, राहणार रामदासवाडी) असे रात्रीचे जेवण करून त्यांच्या घराचे बाहेर गप्पा मारत बसले होते. अचानक तिथे आरोपी संजय नामदेव पाटील, मनोज शंकर खांडगे हे दोघे दुचाकीवरून आले. देवकर बंधूंसोबत झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी संजय याने धारदार चाकूने फिर्यादी यांचा भाऊ अशोक देवकर, कृष्णा देवकर यांच्या गळयावर, छातीवर, पोटावर वार करून गंभीर दुखापती करून त्यांची निघृण हत्या केली आणि फिर्यादी रामदास यांचे हातावर, पोटावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे रामदास यांनी ४ डिसेंबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. दोन्ही आरोपी संजय पाटील आणि मनोज खांडगे यांना पोलिसांनी त्याच दिवशी अटक केली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक एन. के. बानकर, पोलीस निरीक्षक आर. एम. आव्हाड यांनी गुन्हयाचा तपास करून आरोपीविरुद्द सबळ व भक्कम पुराव्याअंती कल्याण सत्र न्यायालय कल्याण येथे दोषारोप पत्र दाखल केले होते.
न्यायालयात सुनावणी चालु असतानाचे कालावधीत आरोपी मनोज खांडगे मरण पावला. या गुन्ह्यात न्यायालयाने फिर्यादी, पंच, साक्षीदार यांच्या साक्षी नोंदवुन परिस्थीतीजन्य पुरावा व वस्तुस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपी संजय नामदेव पाटील याला दोन्ही भावांचे खुनाचे आरोपाखाली व फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या आरोपाखाली भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२,३०७ अंतर्गत दंडनीय गुन्हयासाठी फौजदारी प्रक्रीया संहिता कलम २३५(२) नुसार दोषी ठरवण्यात आले.
अशोक व कृष्णा देवकर या दोन भावांच्या खून प्रकरणात न्यायालयाने आरोपी संजय पाटील याला प्रत्येक गुन्ह्यासाठी जन्मठेप वीस हजार रुपये दंड. दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
फिर्यादी रामदास यशवंत देवकर यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी भा.द. वि.कलम ३०७ अन्वये १० वर्षे सश्रम कारावास दहा हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास ६ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सर्व शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागतील आणि आरोपी कारावासाच्या कालावधीत कोणत्याही माफीसाठी पात्र राहणार नाही, असा निकाल जिल्हा न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी दिला. या खटल्यामध्ये सरकारी अभियोक्ता अश्वीनी भामरे पाटील यांनी युक्तीवाद केला.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू