April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

झुंड चित्रपटाच्या खास शोचे आयोजन

झुंड चित्रपटाच्या खास शोचे आयोजन

कल्याण : ‘झुंड’ चित्रपटाच्या आशयामधून प्रेरणा घ्या – केडीएमसी आयुक्त डॉ. सूर्यवंशी

कल्याण

झुंड’ चित्रपटाच्या आशयामधून प्रेरणा घेऊन अधिकाऱ्यांनी खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावेत, असे उद्गार केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केडीएमसी अधिकारी, पोलीस अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी वर्ग यांच्यासाठी छोटेखानी स्वरूपात आयोजिलेल्या ‘झुंड’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी  काढले. त्याचप्रमाणे केडीएमसीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमधून क्रीडा प्रतिभा निवडून त्यांना संधी निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

केडीएमसीच्या इतिहासात प्रथमच आयुक्तांनी अशाप्रकारे अधिकारी वर्गासाठी एक सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटाच्या खेळाचे आयोजन केले होते. या चित्रपटाच्या खेळापूर्वी झुंड चित्रपटाचे निर्माते नागराज मंजुळे यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी मंजुळे यांनी चित्रपट निर्मितीबाबतच्या आपल्या उद्देशाची माहिती आयुक्त व उपस्थित अधिकाऱ्यांना दिली आणि चित्रपटाच्या खास शो प्रदर्शनाबाबत आयुक्तांना शुभेच्छा दिल्या.

क्रीडा विषयक बाबींना प्रोत्साहन देणेबाबत आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी नेहमीच कटाक्ष ठेवला असून आता कोरोना साथीचे स्वरूप निवळल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांना इतर विकास कामांबरोबरच, क्रीडा बाबींवर लक्ष घालण्यासाठी त्यांनी संधी निर्माण करण्यासाठी उद्युक्त केले आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या क्रीडा गुणांचा विकास करण्याकरिता सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाचा कायापालट करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.

खंबाळपाडा येथे एक अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून त्यामध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ इ. विविध प्रकारच्या खेळांच्या सुविधा खेळाडूंसाठी उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे, महापालिकेच्या आरक्षित जागेत एक इनडोअर कबड्डी स्टेडियम व बारवी येथे एक फुटबॉल स्टेडियम तयार करण्यात येणार आहे. नागरिकांच्या शारीरिक आरोग्य व क्रीडा गुणांच्या विकासासाठी महापालिका क्षेत्रात कबड्डी करिता किमान ५० कबड्डी कोर्ट, तीन फुटबॉल, ५ क्रिकेट, २५ हॉलीबॉल, १० खो-खो मैदाने विकसित करण्याचा मानस आहे. जेणेकरून नागरिकांची खेळाप्रती आवड वाढीस लागून कल्याण-डोंबिवली हे शहर खेळाडूंचे शहर म्हणून ओळखले जावे असा आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांचा मानस आहे. तसेच, खेळाडूंना खेळासाठी मैदाने पूर्ण वेळ उपलब्ध व्हावीत याकरिता खेळाच्या मैदानावर कोणतेही राजकीय समारंभ, लग्न समारंभ आयोजित न करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहे.

खेळाडूंच्या, क्रीडापटूंच्या क्रीडा गुणांना उत्तेजन देण्यासाठी तसेच नागरिक अग्रस्थानी ठेऊन सेवा देण्यासाठी अधिकारी वर्गास प्रोत्साहित करण्याकरिता ‘झुंड’ चित्रपटाच्या खास शोचे आयोजन करण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे महापालिका सचिव संजय जाधव व आयुक्तांचे स्वीय सहाय्यक उमेश यमगर यांनी विशेष परिश्रम घेतले.