नवी मुंबई
कोरोना महामारीच्या काळात हातावर कमावणाऱ्या कामगार व लघू उद्योजकांप्रमाणे कला क्षेत्रातील लोककला व पथनाट्य कलाकारांना देखील काम उपलब्ध नव्हते. आर्थिक संकटात सापडलेल्या लोककला व पथनाट्य कलाकारांना माहिती व जनसंपर्क विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष प्रसिध्दी मोहिमेमुळे काम मिळाल्याने कलाकारांनी समाधान व्यक्त केले आहे.
महाविकास आघाडीच्या शासनातर्फे गेल्या दोन वर्षातील विविध कल्याणकारी योजनांची माहिती कोकणातील गावोगावी पोहचावी, शासनाच्या योजना सामान्य जनतेला सोप्या पध्दतीने समजण्यास मदत व्हावी यासाठी लोककला या प्रभावी माध्यमाव्दारे प्रचार व प्रसिध्दीची मोहिम संपूर्ण राज्यभर दिनांक ०९ ते १७ मार्च या कालावधीत राबविण्यात येत आहे.
या प्रसिध्दी मोहिमेसाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत प्रत्येक जिल्हयाकरीता निवड समितीद्वारे निकषांच्या आधारावर कलापथक व पथनाट्यांची निवड करण्यात आली आहे. कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी व पालघर या जिल्हयांकरीता निवडण्यात आलेल्या कलापथक व पथनाट्यांनी आपले उत्कृष्ट सादरीकरण करून ही प्रसिध्दी मोहिम यशस्वी केली आहे. पथनाट्यांमधील कलाकरांनी सादर केलेल्या कविता, पोवाडे, लोकगीत, भावगीतांच्या तालावर नागरिक ठुमका धरत आहेत.
आज ठाणे जिल्हयात सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत विविध ठिकाणी लोककलापथकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जन्नत मिडीया प्रोडक्शन या कलापथक, श्रीराम प्रासादिक भजनी मंडळ, गुरवली, श्रावास्तवी नाट्यसंस्था यांनी वाघबीळ, ओवळा, दिवा, मुब्रा, भिवंडी,शहापूर व किन्हवली या या ठिकाणच्या बाजारपेठा व वर्दळीच्या भागात कार्यक्रमांचे सादरीकरण केले.
रायगड जिल्हयात अरुणोदय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था, स्वयंमसिध्दा सामाजिक विकास संस्था या लोककला पथनाट्यांनी महाड, पोलादपूर, सानेगांव, शेणवई, रोहा या ठिकाणी कार्यक्रमांचे सादरीकरण केले. रत्नागिरी जिल्हयात आधार सेवा ट्रस्ट, भाकर कलापथक या कलापथकांनी गुहागर, लांजा, या तालुक्यांमधील विविध गावात कार्यक्रमांचे सादरीकरण केले. पालघर जिल्हयात नवली येथील जनजागृती कलामंच, वाडा तालुक्यतील सिध्दीविनायक संस्था, विरार येथील माय नाटक कंपनी यांनी डहाणू, बोर्डी, आशागड, वाडा, विक्रमगड, विरार, वसई या ठिकाणच्या बाजारपेठा व वर्दळीच्या ठिकाणी कार्यक्रमांचे सादरीकरण केले.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू