April 21, 2025

news on web

the news on web in leading news website

केडीएमसी क्षेत्रातील प्रकल्पांची आयुक्तांनी केली पाहणी

केडीएमसी क्षेत्रातील प्रकल्पांची आयुक्तांनी केली पाहणी

कल्याण : केडीएमसी क्षेत्रातील प्रकल्पांची आयुक्तांनी केली पाहणी

कामे त्वरित पुर्ण करण्याबाबत दिले निर्देश

कल्याण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी केडीएमसी क्षेत्रातील विविध विकास प्रकल्पांची पाहणी करुन हि कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

महानगरपालिकेच्या उंबर्डे येथील आरोग्यासाठी आरक्षित जागेवर राष्ट्रीय आरोग्य अभियान व महापालिकेच्या फंडातून नागरी आरोग्य केंद्र बांधण्याचे काम सुरू आहे. या नागरी आरोग्य केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून यामुळे उंबर्डे, सापर्डे इ. गावांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या नागरी आरोग्य केंद्रालगत असलेल्या तबेल्याचे सांडपाणी आरोग्य केद्रांच्या परिसरात येणार नाही याबाबत तबेला धारकास नोटिस देण्याबाबतच्या सूचना त्यांनी ब प्रभागाचे सहा. आयुक्तांना दिल्या. तसेच आरोग्य केंद्राच्या पहिल्या मजल्यावरील बांधकाम, वाडेभिंत याबाबतचे प्राकलन तयार करुन मंजूरीसाठी सादर करण्याबाबत सूचना देखील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना दिल्या.

उंबर्डे येथील रिंगरोड लगत सर्वसमावेशक आरक्षणाखाली तळ+४ मजल्याची सुमारे एक हजार चौ.मी क्षेत्राची बंदिस्त इमारत महापालिकेच्या ताब्यात असून या ठिकाणी हृदयरोगाच्या रुग्णांना उपचारासाठी कॅथलब तसेच, किडणीच्या आजाराने त्रस्त रुग्णांना उपचारासाठी डायलेसिस सेंटर करणे प्रस्तावित आहे. या ठिकाणी मोफत/अल्प दरात सुविधा उपलब्ध होणार आहे. याकामाची देखील आयुक्तांनी पाहणी करुन संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या.

कोळवली येथे सर्वसमावेश आरक्षणाअंतर्गत शंकेश्वर काम्प्लेक्स जवळ, तळ +२ मजली इमारत उपलब्ध झाली आहे. या ठिकाणी कर्करोगाच्या रुग्णांसाठी रेडीओ थेरीपी आणि केमोथेरीपी  सेंटर सुरू करणे प्रस्तावित आहे. या कामाची देखील आयुक्तांनी पाहणी केली. रिंगरोडने बाधित होणारी कोळवली व उंबर्ड येथील निवासी घरे निष्कासित करण्यासाठी त्यांचे पुर्नवसन तातडीने करण्याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी नगररचनाकार रघुवीर शेळके यांना दिल्या.

उंबर्डे व बारावे येथील डंपिंग ग्राऊडच्या ४ पोहोच रस्त्यांची कामे विकास योजने नुसार प्रगतीपथावर आहेत, या रस्त्यामधील बाधित होणारी बांधकामे तातडीने निष्कासित करण्याबाबत सूचना आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी ब प्रभागाचे सहा. आयुक्त यांना दिल्या. मुरबाड रोड ते रामबाग लेन नं.१ पर्यंतच्या कॉक्रीट रस्त्यालगतचे गटार जूने व मोडकळीस आल्याने पावसाळ्यात मोठया प्रमाणात पाणी साचून नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होतात, या तक्रारीचे निवारण करण्यासाठी गटारीच्या कामाचे प्राकलन तातडीने तयार करुन सादर करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांना दिल्या.

महम्मद अली चौक ते महात्मा फुले चौक या गर्दीच्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीकोनातून या रस्त्यामधील रस्ता दुभाजक व विदयुत पोल काढून टाकण्याच्या सूचना देखील त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. चोळे गाव ठाकुली (पू) येथे भाजी मार्केट साठी आरक्षित तळ+२ मजली इमारती मध्ये तळमजल्यावर डायलेसिस सेंटर आणि वरच्या दोन मजल्यावर नागरी आरोग्य केंद्र करणे प्रस्तावित असून सदर काम अंतिम टप्प्यात आहे. हे डायलेसिस सेंटर बाह्यसंस्थेमार्फत चालविण्यात येणार असून किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांना मोफत, अल्प दरात सुविधा उपलब्ध होणार आहे. या कामाची देखील आयुक्तांनी पाहणी केली.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय डोंबिवली (प.) येथे प्रत्येकी १० बेड क्षमतेचा NICU आणि PICU तसेच २० बेड क्षमतेचा बालरोग विभाग सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणचे बांधकाम अंतिम टप्यात असून ते लोकार्पण करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर पूर्ण करणेबाबत सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.

या पाहणी दौऱ्यासमयी कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, व्ही. एस. पाटील, नगररचनाकार रघुवीर शेळके, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. पानपाटील, डॉ. समीर सरवणकर, ब प्रभागाचे सहा. आयुक्त चंद्रकांत जगताप व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.